Dattatray Bharne On Farmer Loan Waiver : राज्यातील कर्जमाफीच्या निर्णयाबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. यासाठी 30 जून ही यासाठी अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा थेट फायदा होणार असून, यासाठी साधारणतः 36,585 कोटी रुपयांची मोठी रक्कम लागणार आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी योजना असल्याचा दावा त्यांनी केला असून, शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनांनुसार यामध्ये आणखी काही सकारात्मक बदल करण्याबाबत मुख्यमंत्री स्वतः बैठक घेऊन निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने ही कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ
या योजनेविषयी बोलताना कृषिमंत्र्यांनी सांगितले की, ‘या कर्जमाफीमध्ये कोणत्याही प्रकारची क्षेत्राची (जमिनीची) अट ठेवण्यात आलेली नाही. तसेच, 2019 मधील कर्जमाफीत दोन लाखांच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नव्हता; परंतु, यावेळेस दोन लाखांच्या वर समजा 2 लाख 20 हजार कर्ज असेल आणि शेतकऱ्याने वरील 20 हजार रुपये भरले, तर त्याला उर्वरित दोन लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे.’ पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, केवळ या एकाच बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2100 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे.
खतांचा पुरेसा साठा उपलब्ध
कर्जमाफीसोबतच कृषिमंत्र्यांनी राज्यातील मान्सून आणि पेरण्यांच्या परिस्थितीवरही भाष्य केले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24 जूननंतर राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय होईल. मात्र, शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता जमिनीतील ओलावा तपासूनच पेरणी करावी, जेणेकरून त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही, असे आवाहन त्यांनी केले. सध्या राज्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून केंद्र सरकारकडून राज्याला मिळालेले खतांचे आवंटन वेळेत मिळवण्यासाठी मुख्यमंत्री आणि ते स्वतः केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करत आहेत. विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर बोलताना त्यांनी सध्यातरी तशी परिस्थिती नसून पावसाचा अंदाज घेऊनच पुढील पावले उचलली जातील, असे स्पष्ट केले.