CRPF Cover to Harbhajan Singh after after Protest in Jalandhar : आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये मोठा धक्का बसला असून पक्षाच्या 7 राज्यसभा खासदारांनी एकाच वेळी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. यामध्ये माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह, राघव चड्ढा, संदीप पाठक, स्वाती मालीवाल, राजिंदर गुप्ता, अशोक मित्तल आणि विक्रमजीत सिंह साहनी यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. यानंतर पंजाबमधील आप सरकारने माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगची Z+सुरक्षा व्यवस्था काढून घेतली होती. या तापलेल्या राजकारणातच हरभजन सिंग यांच्या घरावर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी 'गद्दार' असे लिहित निदर्शने केली होती. यानंतर हरभजन यांना केंद्रीय गृहखात्याकडून सीआरपीएफ सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे.
दरम्यान, एकाच वेळी 7 खासदारांनी साथ सोडणे हा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय झटका मानला जात आहे. या मोठ्या घडामोडीमुळे दिल्ली आणि पंजाबमध्ये 'आप'च्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले असून कार्यकर्त्यांनी या 7 खासदारांच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. यात माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांना जोरदार रोषाचा सामना करावा लागला असून संतापलेल्या लोकांनी त्यांच्या घरावर 'गद्दार' लिहिले आहे. आता पंजाबमध्ये या सात खासदारांना होणारा वाढता विरोध लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्व सातही खासदारांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ जवान तैनात केले आहेत.
हरभजन सिंह यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शने
जालंधरमध्ये माजी फिरकीपटू आणि खासदार हरभजन सिंह यांच्या घराबाहेर संतापलेल्या 'आप' समर्थकांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. आंदोलक इतके संतप्त होते की त्यांनी हरभजन सिंह यांच्या घराच्या भिंतीवर आणि प्रवेशद्वारावर "गद्दार" असे लिहून आपला रोष व्यक्त केला. पक्ष सोडून भाजपमध्ये गेल्याने समर्थक स्वतःला फसवल्यासारखे मानत आहेत. या कृत्यामुळे परिसरातील तणाव वाढला असून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. कार्यकर्त्यांच्या मते, ज्या पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले, त्याच पक्षाशी त्यांनी बेईमानी केली आहे.
राघव चड्ढा यांचा पक्षावर गंभीर आरोप
या संपूर्ण बंडाचे नेतृत्व करणाऱ्या राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत आपल्या निर्णयाचे समर्थन केले. 'आम आदमी पार्टी आपल्या भ्रष्टाचारविरोधी मूळ तत्त्वांपासून पूर्णपणे भरकटली आहे,' असा गंभीर आरोप चड्ढा यांनी केला. राज्यसभेतील 2/3 (दोन-तृतीयांश) खासदारांनी एकत्रितपणे भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतल्याने तांत्रिकदृष्ट्या त्यांची खासदारकीही कायम राहणार आहे. संविधानाच्या चौकटीत राहूनच आम्ही हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कधीकाळी केजरीवाल यांचे खंदे समर्थक असलेले चड्ढा आता भाजपच्या बाजूने मैदानात उतरले आहेत.
केजरीवाल यांच्यासमोर मोठे आव्हान
या 7 खासदारांच्या जाण्यामुळे आम आदमी पार्टीमध्ये मोठे अंतर्गत संकट निर्माण झाले आहे. राघव चड्ढांसारखा तरुण चेहरा आणि हरभजन सिंह यांच्यासारखा लोकप्रिय नेता पक्षातून बाहेर पडल्याने आगामी काळात पक्षाच्या प्रतिमेवर मोठा परिणाम होऊ शकतो. भ्रष्टाचार विरोधातील लढाईचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या 'आप'वर आता त्यांच्याच जुन्या नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या राजकीय भूकंपाचे पडसाद येणाऱ्या निवडणुकीत कसे उमटतात आणि केजरीवाल या 'डॅमेज कंट्रोल'साठी काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.