Kalpana Kharat Bail Update: भोंदू अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शिर्डीतील एका शेतकऱ्याच्या जमीन फसवणूक प्रकरणात अटकेच्या भीतीने तिने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज राहता न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता कल्पना खरातला कोणत्याही क्षणी अटक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
सव्वा तास चालला युक्तिवाद
राहता न्यायालयात आज या अर्जावर सुमारे सव्वा तास दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. आरोपीच्या वकिलांनी मांडलेले मुद्दे सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी पुराव्यानिशी खोडून काढले. अखेर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायमूर्तींनी कल्पना खरातला दिलासा देण्यास नकार दिला. 31 मार्चपासून फरार असलेल्या कल्पनाचा शोध घेण्यासाठी शिर्डी पोलिसांसमोर आता मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
देश सोडून पळ काढू नये म्हणून 'लुक आऊट' नोटीस
जमीन फसवणुकीच्या या प्रकरणात पैशांचे व्यवहार कल्पनाच्या भावांच्या बँक खात्यातून झाल्याचे 'एसआयटी' (SIT) तपासात उघड झाले आहे. यापूर्वी पोलिसांनी तिचा मुलगा हर्षवर्धन आणि दोन्ही भावांची कसून चौकशी केली आहे. कल्पना खरात परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तिच्याविरुद्ध यापूर्वीच 'लुक आऊट नोटीस' जारी केली आहे. कल्पना खरातचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. एसआयटीच्या पथकाने नाशिकमधील तिच्या जवळच्या मैत्रिणींची चौकशी सुरू केली आहे. खरातच्या घरी काम करणाऱ्या जुन्या आणि नवीन नोकरांकडून तिचे 'लोकेशन' शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशोक खरातच्या बेकायदेशीर साम्राज्यात तिची सक्रिय भागीदारी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
सुनीता शिंदे ते कल्पना खरात: गुन्हेगारी प्रवासाचा उलगडा
मूळची सिन्नर तालुक्यातील पाडळी गावची असलेल्या सुनीता शिंदेचा 1993 मध्ये अशोक खरातशी विवाह झाला आणि ती 'कल्पना खरात' झाली. सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुनीताने अशोकच्या काळ्या कृत्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचे तपासात समोर आले आहे.