Saamana On Congress: काँग्रेसने ताणून धरलं आणि सत्तेचा डाव विखुरला; राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकांवरून सामनातून काँग्रेसवर टीकास्त्र

महाविकास आघाडी सरकार कोसळण्यास काँग्रेसचा एक निर्णय सर्वाधिक कारणीभूत ठरला, असा थेट आरोप शिवसेनेने केला आहे.

Saamana On Congress: काँग्रेसने ताणून धरलं आणि सत्तेचा डाव विखुरला; राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकांवरून सामनातून काँग्रेसवर टीकास्त्र

Saamana On Congress: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर आणि ऐतिहासिक निर्णयांवर कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसने विधानसभेच्या जागावाटपावेळी घेतलेली ताठर भूमिका आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा, या दोन प्रमुख मुद्द्यांवरून काँग्रेसला लक्ष्य करण्यात आले आहे. या टीकेमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

13 जागांच्या यशाचा फुगा आणि विधानसभेला बसलेला फटका
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला भरभरून मतदान केले होते, ज्यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा मिळाल्या होत्या. मात्र, याच 13 जागांच्या यशाने काँग्रेसमध्ये अवाजवी आत्मविश्वास निर्माण झाला, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे. “लोकसभेच्या यशानंतर विधानसभेच्या जागावाटपाच्या वेळी काँग्रेसने शेवटपर्यंत नको तितके ताणून धरले, ज्याचा मोठा फटका संपूर्ण आघाडीला बसला,” असे यात नमूद करण्यात आले आहे. राहुल गांधी सन्मानाने विरोधी पक्षनेते झाले, यात महाराष्ट्रातील 13 जागांचा मोठा वाटा होता, पण त्याचे रूपांतर विधानसभेच्या विजयात करण्यात काँग्रेसला मर्यादा आल्याचे यात म्हटले आहे.

विधानसभा अध्यक्षपदाचा ‘तो’ राजीनामा आणि सत्तेला तडे
महाविकास आघाडी सरकार कोसळण्यास काँग्रेसचा एक निर्णय सर्वाधिक कारणीभूत ठरला, असा थेट आरोप शिवसेनेने केला आहे. तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी कोणाशीही विचारविनिमय न करता तडकाफडकी दिलेला राजीनामा हा महाविकास आघाडीला तडे देणारा ठरला. “आज महाराष्ट्रात जे राजकीय पेचप्रसंग निर्माण झाले आहेत, त्याचे मूळ विधानसभा अध्यक्षांच्या त्या राजीनाम्यातच आहे. जर तेव्हा घटक पक्षांशी संवाद झाला असता, तर महाविकास आघाडीचे सरकार किमान पुढील 15 वर्षे तरी सत्तेत राहिले असते,” असा दावा ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

संवादाचा अभाव  
काँग्रेसने घेतलेल्या एकतर्फी निर्णयामुळे केवळ सरकारच गेले नाही, तर संपूर्ण आघाडीची राजकीय गणिते बिघडली, असा सूर या टीकेतून उमटत आहे. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जुन्या जखमांना पुन्हा उजाळा देण्यात आला आहे. मित्रपक्षांना विश्वासात न घेता घेतलेले निर्णय भविष्यातही घटक पक्षांसाठी घातक ठरू शकतात, असा इशाराच जणू शिवसेनेने या माध्यमातून दिला आहे.

हेही वाचा – Karuna Munde: बारामती पोटनिवडणुकीत ट्विस्ट; सुनेत्रा पवारांविरुद्ध करुणा मुंडेंनी ठोकला शड्डू, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

महाविकास आघाडीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह?
लोकसभेत मिळवलेले यश विधानसभेत टिकवण्यात आलेल्या अपयशाला काँग्रेसची ‘ताणून धरण्याची वृत्ती’ जबाबदार असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. या टीकेनंतर आता काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ऐन निवडणुकांच्या धामधुमीत मित्रपक्षानेच घरचा आहेर दिल्यामुळे महाविकास आघाडीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number