Congress RSP Alliance : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. एकीकडे ठाकरे बंधूंची युती आणि दुसरीकडे महायुतीचे आव्हान असतानाच, काँग्रेस आणि महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) आगामी निवडणुकांसाठी हातमिळवणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महादेव जानकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या नव्या युतीची घोषणा केली.
'हुकूमशाही विरुद्ध बहुजन विचार' – हर्षवर्धन सपकाळ
युतीची घोषणा करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, भाजप ज्या प्रकारे लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हा आमचा मुख्य विचार आहे. केवळ महानगरपालिकाच नव्हे, तर जिल्हा परिषद आणि आगामी सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि रासप खांद्याला खांदा लावून लढतील. नगरपरिषद निवडणुकांतही आम्हाला जानकरांच्या पक्षाची मोठी मदत झाली आहे.
हेही वाचा – Kudal Court Arrest Warrant : मंत्री नितेश राणेंना कुडाळ न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी; दोन आमदारांनाही दणका
'मी स्वतःहून काँग्रेसकडे गेलो' – महादेव जानकर
रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी या युतीमागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसची साथ देणे काळाची गरज आहे. मला काँग्रेसने निमंत्रण दिले नव्हते, तर मी स्वतःहून हा निर्णय घेऊन त्यांच्यासोबत आलो आहे. देशाच्या हितासाठी वैयक्तिक मतभेद बाजूला सारून एकत्र लढणे आवश्यक आहे.
हेही वाचा – Cabinet Decisions: मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले 'हे' चार मोठे निर्णय; काय होणार फायदा? वाचा
पक्ष चोरणाऱ्या टोळीला जनता धडा शिकवेल
महादेव जानकरांनी यावेळी सत्ताधारी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. पूर्वी मुले पळवणारी टोळी सक्रिय असायची, आता महाराष्ट्रात थेट 'राजकीय पक्ष चोरणारी टोळी' आली आहे, असा टोला त्यांनी लगावला. मुंबईसह राज्यातील अनेक शहरांतील कार्यकर्त्यांची निवडणूक लढण्याची तीव्र इच्छा होती, म्हणून आम्ही या आघाडीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.