Ambadas Danve: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले असून, ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. “निवडणूक बिनविरोध करावी, ही आपली संस्कृती नाही,” असे रोखठोक विधान दानवे यांनी केले आहे. बारामतीमध्ये ही निवडणूक बिनविरोध होणार की लढवली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना दानवे यांच्या प्रतिक्रियेने नव्या चर्चेला उधाण आले आहे.
9 तारखेपर्यंत प्रतीक्षा करा; भूमिकेवर दानवे यांचे स्पष्टीकरण
पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीवर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, “निवडणूक बिनविरोध व्हावी अशी काहींची भावना असू शकते, पण लोकशाहीत निवडणूक लढवणे हीच पद्धत आहे. वहिनींच्या (सुनेत्रा पवार) मागे उभे राहणे ही संस्कृती असली, तरी राजकीय भूमिका वेगळी असू शकते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 9 एप्रिलपर्यंत आहे. त्यामुळे या विषयावर 9 तारीख उजाडू द्या, त्यानंतरच खरी आणि स्पष्ट भूमिका समोर येईल.”
हेही वाचा – NCP Melava Gondia : पटेलांचं तटकरेंच्या पावलावर पाऊल, मेळाव्याच्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
काँग्रेसच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्याचे कारण नाही
बारामतीमध्ये महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने जर आपला उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला, तर त्यावर आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. “जर काँग्रेस या ठिकाणी निवडणूक लढवण्यास इच्छुक असेल आणि उमेदवार उभा करत असेल, तर त्याला विरोध करण्याचे कारण दिसत नाही. कोणत्याही निवडणुकीत सहभाग घ्यायचा की नाही, हे ज्या-त्या पक्षाच्या धोरणावर अवलंबून असते,” असेही त्यांनी नमूद केले.