Devendra Fadnavis: ‘आधी भारतात या, मग विचारा…’; TET पेपरफुटीवरून फडणवीसांचा राहुल गांधींवर थेट पलटवार

राहुल गांधींच्या या आरोपांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे.

Devendra Fadnavis: ‘आधी भारतात या, मग विचारा…’; TET पेपरफुटीवरून फडणवीसांचा राहुल गांधींवर थेट पलटवार

Devendra Fadnavis: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यावरून परतताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून महाराष्ट्र TET परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींच्या या आरोपांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पेपरफुटीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी आणि गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यासाठी सरकारने अत्यंत तत्परतेने पावले उचलली, ज्यामुळेच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. राहुल गांधींवर निशाणा साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, ते आपला बहुतांश वेळ परदेशात घालवत असल्याने त्यांना या कारवाईची माहिती नसावी; तसेच त्यांनी हे ट्विट भारतातून केले की परदेशातून, असा खोचक सवालही फडणवीसांनी उपस्थित केला.

‘आम्ही पेपर फुटण्यापूर्वीच कारवाई केली’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांमधील हवा काढून घेतली. ते म्हणाले, “राहुल गांधींना कदाचित हे माहित नसावे की, पेपरफुटीच्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी सरकारने स्वतःहून पुढाकार घेतला आणि म्हणूनच परीक्षा पुढे ढकलली गेली. महाराष्ट्र सरकार आणि आमच्या पोलिसांनी ही कारवाई पेपर लीक झाल्यानंतर नाही, तर तो होण्यापूर्वीच केली आहे. आगामी काळात परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी संपूर्ण पूर्वतयारी सुरू असून, लवकरच परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाईल.” राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर टोला लगावताना ते पुढे म्हणाले की, ते नेहमी परदेशात राहत असल्याने त्यांना इथल्या प्रत्येक घडामोडीची अचूक माहिती असेलच असे नाही.

राहुल गांधींच्या ‘X’ पोस्टमधील 3 प्रमुख मागण्या आणि सरकारवर घणाघात

तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी महाराष्ट्र TET परीक्षा रद्द झाल्यानंतर नवीन तारीख जाहीर न झाल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती. यंत्रणेच्या चुकीची शिक्षा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना का दिली जात आहे? असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर 3 प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या. राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, महाराष्ट्र TET चा पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द झाली आणि जवळपास 6 लाख उमेदवार अनिश्चिततेच्या गर्तेत अडकले आहेत. 2 आठवडे उलटून गेले तरी नवीन तारखेचा पत्ता नाही. मुख्य आरोपी मोकाट आहेत, यंत्रणेला काहीही झालेली नाही आणि शिक्षा मात्र प्रामाणिक विद्यार्थ्यांना मिळत आहे. भारताचे भविष्य घडवणाऱ्या या शिक्षकांनी वर्षानुवर्षे मेहनत केली, फी भरली, दूरचा प्रवास केला आणि आता ते केवळ उत्तराची वाट पाहत आहेत.

राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांकडे मागितलेल्या 3 गोष्टी 

कालमर्यादा – TET परीक्षेची नवीन तारीख तातडीने घोषित करा.

उत्तरदायित्व – पेपर फुटीस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, विद्यार्थ्यांवर नाही.

भविष्याचे रक्षण – या गोंधळामुळे ज्या उमेदवारांचे वर्ष वाया गेले, त्यांना वयोमर्यादेत विशेष सवलत द्या.

हेही वाचा – Maharashtra Cabinet Meeting : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत धडाकेबाज निर्णय

17 जुलै रोजी राहुल गांधी घेणार विशेष सत्र; 27 जूनला उघडकीस आले होते रॅकेट

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे नमूद केले की, ते 17 जुलै रोजी डेहराडूनमध्ये देशातील पेपर फुटीच्या वाढत्या संकटावर तरुणांशी सविस्तर संवाद साधणार असून, आता शिक्षण क्रांतीची वेळ आली आहे. दरम्यान, ही महाराष्ट्र TET परीक्षा मूळची 28 जून रोजी होणार होती. परंतु, परीक्षेच्या अवघ्या 1 दिवसापूर्वी म्हणजेच 27 जून रोजी ठाणे जिल्ह्यात पेपर फुटीचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर ती तडकाफडकी पुढे ढकलण्यात आली. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रश्नपत्रिका नव्याने तयार केल्या जात असून कडक सुरक्षा उपाय लागू केले जात असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number