Cm devendra fadanvis on bihar election result: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या अभूतपूर्व विजयानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर बिहारच्या जनतेने विश्वास दाखवल्याचे स्पष्ट केले. सुरुवातीच्या कलांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, 2010 सालचा विक्रम तुटू शकतो, अशा प्रकारचा विजय एनडीएला प्राप्त होत आहे.
मोदी-नितीश यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
पंतप्रधान मोदींवर असलेले बिहारवासीयांचे प्रेम आणि विश्वास या निकालावरून स्पष्ट होत आहे, असे फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर, मुख्यमंत्री नितीश कुमार यांची स्वच्छ प्रतिमा आणि सुशासन यावरही या निकालातून शिक्कामोर्तब झाले आहे. बिहारमध्ये 160 जागांच्या पुढे जाऊ, असा आम्हाला विश्वास होता. पण बिहारच्या जनतेने आम्हाला त्याहीपेक्षा जास्त मतदान करून आमच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
यशस्वी युती: एलजेपीचे चिराग पासवान, मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांच्यासह आमची मोठी चांगली युती बिहारमध्ये झाली होती आणि या युतीला बिहारमधील जनतेने मोठा प्रतिसाद दिला आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.
काँग्रेसच्या प्रचाराला जनतेचे प्रत्युत्तर
एनडीएच्या विजयाचे विश्लेषण करताना फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार टीका केली. फडणवीस म्हणाले, "या विजयानंतर काँग्रेस व राहुल गांधी यांनी देशात चालवलेल्या विषारी प्रचाराला जनतेनं हे प्रत्युत्तर दिलं आहे." राहुल गांधींनी नदीत उड्या टाकून पाहिल्या, डान्स केला; पण काही उपयोग झाला नाही. पण लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यावरच आहे. बिहारमध्ये जातीचा मुद्दा मागे पडला, इतर मुद्दे मागे पडले. बिहारच्या जनतेसाठी विकास आणि सुशासन हेच मुद्दे प्रमुख ठरले, असे फडणवीस म्हणाले.
संवैधानिक संस्थांचा अपमान: "सातत्याने संवैधानिक संस्थांचा अपमान करणं, संवैधानिक मार्गाने काम करत असताना त्याला विरोध करणं, जनतेने निवडून दिलेल्या सरकारचा अपमान करणं… जनतेलाही कळलेलं आहे की, हे आरोप म्हणजे आमच्या मतांचा अपमान आहे. त्यामुळे जोपर्यंत राहुल गांधी हे वर्तन ठेवतील, तोपर्यंत काँग्रेसची स्थिती अशीच राहील," असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
काँग्रेसची दयनीय अवस्था आणि सर्वात कमी स्कोर
बिहारमधील निकालांमध्ये काँग्रेसची दयनीय अवस्था झाल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले. फडणवीस म्हणाले की, आरजेडीपेक्षाही काँग्रेसची हालत खराब आहे. काँग्रेस एमआयएम आणि कम्युनिस्ट पक्षांपेक्षाही खाली घसरली आहे आणि काँग्रेसचा बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी स्कोर आलेला आहे.
राहुल गांधींना आत्मपरीक्षणाचा सल्ला: राहुल गांधींनी केलेला 'वोटचोर'चा आरोप फेटाळत फडणवीस म्हणाले की, त्यांचा पक्ष, त्यांच्यासोबतचे इतर पक्ष आणि ते स्वतः (राहुल गांधी) जोपर्यंत आत्मपरीक्षण (Self-Introspection) करत नाहीत, तोपर्यंत ते निवडून येऊ शकत नाहीत. त्यांचे पतन होतच राहील. इथून पुढेही आणखी होईल, असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्रीपदावर कोण येणार?
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका पार पडल्या आहेत, त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार, हे पक्षश्रेष्ठी ठरवतील आणि त्यावर बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.