Rohit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाला 3 महिने उलटूनही तपासात प्रगती नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवारी रोहित पवार यांनी पुण्याच्या सीआयडी (CID) कार्यालयाला तिसऱ्यांदा भेट दिली. मात्र, यावेळी एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत कार्यालयातील रिकाम्या खुर्चीलाच आपले निवेदन सादर केले.
तपास यंत्रणेच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास सीआयडीमार्फत सुरू आहे, परंतु अद्याप कोणावरही ठोस कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला आहे. सीआयडी कार्यालयाला दिलेल्या तिसऱ्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “मी आज तिसऱ्यांदा येथे आलो आहे, पण एकही जबाबदार अधिकारी जागेवर उपस्थित नाही. पहिल्या भेटीत तीन आणि दुसऱ्या भेटीत एक अधिकारी होता, पण आज शून्य अधिकारी आहेत. सरकार आणि तपास यंत्रणा या संवेदनशील प्रकरणाला गांभीर्याने घेत नसल्याचेच हे लक्षण आहे.”
रिकाम्या खुर्चीचे फोटो आणि उपरोधिक टीका
अधिकारी उपस्थित नसल्याने रोहित पवार यांनी कार्यालयातील रिकाम्या खुर्चीचे फोटो काढले. त्यांनी उपरोधिकपणे टीका केली की, “कदाचित आयपीएल क्रिकेट सामन्यांमुळे अधिकाऱ्यांना या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नसावा. पुढच्या वेळी मला कदाचित वॉचमनशीच संवाद साधावा लागेल किंवा गेटवरच कागदपत्रे देऊन यावे लागेल.” एका राज्याच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाताचा तपास इतक्या संथ गतीने आणि निष्काळजीपणे होणे ही अत्यंत निराशाजनक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
कलम 180 अंतर्गत जबाब नोंदवण्याची मागणी
अधिकारी उपस्थित नसले तरी रोहित पवार यांनी आपले लेखी निवेदन तेथील रिकाम्या खुर्चीसमोर ठेवून आपला निषेध नोंदवला. या निवेदनात त्यांनी अजित पवारांच्या अपघाताचा तपास केवळ तांत्रिक मुद्द्यांवर न करता गुन्हेगारी कोनातूनही (Criminal Angle) वेगाने करण्याची मागणी केली आहे. तसेच, आपले हे निवेदन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) 2023 च्या कलम 180 अंतर्गत अधिकृत जबाब म्हणून नोंदवून घ्यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
अजितदादांना न्याय मिळणार का?
तपास यंत्रणेच्या या भूमिकेमुळे ‘अजितदादांना खरंच न्याय मिळणार का?’ असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तपासात काहीही निष्पन्न न झाल्याने राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणात निष्पक्ष तपासाची मागणी करत, जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.