Chandrashekhar Bawankule: शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राज्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानाला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदावर कायम राहतील, असा मोठा दावा बावनकुळेंनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हे अष्टपैलू कर्तृत्वाचे नेते असून राज्याला त्यांचेच खंबीर नेतृत्व लाभावे, ही महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेची तीव्र भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संजय राऊत यांनी फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी टिप्पणी केली होती. या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असतानाच, बावनकुळेंनी थेट 2034 पर्यंतचा कालखंड सांगत विरोधकांचे दावे फेटाळून लावले आहेत.
मोशी दुर्घटनेवरील विरोधकांच्या आरोपांचा समाचार
राज्यात घडलेल्या मोशी दुर्घटनेनंतर विरोधकांकडून बचावकार्याबाबत होत असलेल्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. केवळ आरोप करणे हेच विरोधी पक्षाचे काम बनले असून, शासन मात्र संपूर्ण ताकदीने बाधितांच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहे, असे त्यांनी सांगितले. शोधकार्य संथगतीने सुरू असल्याचा दावा विरोधकांनी केला होता. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, ही अत्यंत मोठी आणि गंभीर घटना असून प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र सरकार, स्थानिक जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महानगरपालिकेची यंत्रणा घटनास्थळी पूर्ण ताकदीने सक्रिय आहे.
हेही वाचा – Pravin Darekar: 'तुमची उंची आणि कुवत किती?'; प्रवीण दरेकरांचा बच्चू कडू यांच्यावर निशाणा
प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध
विरोधी पक्षाकडून राजकीय हेतूने प्रेरित होऊन कितीही दावे केले जात असले, तरी प्रत्यक्ष जमिनीवर प्रशासन अत्यंत वेगाने काम करत असल्याचे बावनकुळेंनी स्पष्ट केले. संकटसमयी राजकारण बाजूला ठेवून लोकांना तात्काळ दिलासा देणे ही सरकारची प्राथमिकता आहे. शासन आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आणि कार्यरत असल्याचा ठाम विश्वास त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.