Anjali Damania: नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात आणि राज्यातील बड्या राजकारण्यांमधील ‘मधुर’ संबंधांचा कच्चाचिठ्ठा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. खरातच्या मोबाईल संभाषणाची (Call Logs) संपूर्ण यादीच दमानिया यांनी सादर केली असून, यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंच्या दिग्गज नेत्यांची नावे असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळेच खरातचे जाळे पसरल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
रुपाली चाकणकर यांच्याशी 177 वेळा संपर्क; SIT चौकशीची मागणी
अंजली दमानिया यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात घनिष्ठ संबंध असल्याचे दिसून येत आहे. चाकणकर यांनी खरातला तब्बल 177 वेळा फोन केले होते, ज्यामध्ये एका संभाषणाचा कालावधी 22 मिनिटांपर्यंत होता. “महिना उलटून गेला तरी अद्याप चाकणकरांची चौकशी का झाली नाही?” असा सवाल करत दमानिया यांनी आता थेट SIT कडे त्यांच्या चौकशीची मागणी लावून धरली आहे.
दिग्गज नेत्यांच्या नावांनी राजकीय वर्तुळात खळबळ
अशोक खरातच्या संपर्कात केवळ सामान्य लोकच नव्हते, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत प्रभावशाली चेहरे होते. दमानिया यांनी जाहीर केलेल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, जयंत पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह दादा भुसे आणि विखे पाटील यांच्या पीए (PA) च्या नावांचा समावेश आहे. विशेषतः जयंत पाटील यांचे नाव या यादीत पाहून आपल्याला दुःख झाल्याची भावना दमानिया यांनी व्यक्त केली. या नेत्यांनी खरातशी नक्की कोणत्या कारणासाठी संपर्क साधला, याचे उत्तर आता जनतेला हवे आहे.
प्रशासकीय अधिकारीही खरातच्या ‘दरबारी’
केवळ राजकारणीच नव्हे, तर महसूल आणि पोलीस यंत्रणेतील बडे अधिकारीही खरातच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. यामध्ये तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि अभिजित भांडे पाटील यांसारख्या अधिकाऱ्यांवर दमानिया यांनी निशाणा साधला आहे. “खरात मोठा कसा झाला? त्याला राजकारणी आणि अधिकाऱ्यांनीच मोठे केले. काही जण भविष्य विचारायला गेले असतील, पण काही मात्र आपले विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी तिथे जात होते,” असा घणाघाती आरोप दमानिया यांनी केला आहे. हा संपूर्ण डेटा आता तपास यंत्रणांकडे सोपवण्यात येणार असल्याने अनेक बड्यांचे धाबे दणाणले आहेत.