Actress Car Accident: चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. राजस्थानी मॉडेल आणि अभिनेत्री हर्षिल कालिया हिचा जयपूरमध्ये एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राजस्थानी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून तिचे चाहते आणि कुटुंबिय हादरून गेले आहेत. अवघ्या 30 व्या वर्षी हर्षिलने जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नियंत्रण सुटले आणि कार उलटली
मिळालेल्या माहितीनुसार, हा दुर्दैवी अपघात जयपूरमधील शिप्रा पथ परिसरात घडला. हर्षिल कालिया रात्री उशिरा आपले काम संपवून घरी परतत होती. प्रवास करत असताना अचानक तिचे आपल्या कारवरील नियंत्रण सुटले. वेग अधिक असल्याने कार थेट रस्त्यावरील दुभाजकावर आदळली आणि जोरदार धडक बसल्याने उलटली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आणि घटनास्थळी मोठी घबराट पसरली.
डोक्याला गंभीर दुखापत ठरली जीवघेणी
अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत उलटलेली कार सरळ केली आणि हर्षिलला बाहेर काढले. तिला गंभीर जखमी अवस्थेत जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती. तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हर्षिलच्या डोक्याला झालेली गंभीर दुखापत तिच्या मृत्यूचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
कलाक्षेत्रात उमटवला होता ठसा
हर्षिल कालिया ही राजस्थानी कलाविश्वातील एक ओळखीचा चेहरा होती. तिने 'Crime Next Door' या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय अनेक राजस्थानी म्युझिक व्हिडिओ आणि मॉडेलिंग क्षेत्रातही तिने नाव कमावले होते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग होता. तिच्या अचानक जाण्याने एका उगवत्या कलाकाराचा अंत झाला असल्याची भावना व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून हर्षिलच्या निधनाने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.