Sharad Pawar Post: 1967 पासून सुरू झालेला मतदानाचा अखंड प्रवास यंदा प्रथमच थांबणार आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यंदा बारामती पोटनिवडणुकीत मतदान करू शकणार नसल्याचे अत्यंत खेदपूर्वक जाहीर केले आहे. रुग्णालयातूनच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बारामतीकरांशी संवाद साधला.
“अत्यंत व्यथित अंत:करणाने सांगतोय…”
आपल्या पोस्टमध्ये शरद पवार भावूक झाले आहेत. त्यांनी म्हटले की, “गेल्या 59 वर्षांत मी एकदाही मतदानाचा हक्क चुकवला नाही. स्व. अजित पवार यांच्या निधनामुळे होत असलेल्या या पोटनिवडणुकीसाठी मी बारामतीला येणारच होतो. मात्र, डॉक्टरांनी प्रकृतीचे कारण देत प्रवासावर सक्त मनाई केली आहे. नाईलाजास्तव आणि जड अंत:करणाने मला मतदानापासून दूर राहावे लागत आहे. बारामतीचे नागरिक मला समजून घेतील, याची खात्री आहे.”
सुनेत्रा वहिनींना मतदान करा; पवारांची साद
मतदान करता येणार नसले तरी, शरद पवारांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. “आमच्या पक्षाने सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. ही अजितदादांना वाहिलेली श्रद्धांजलीच असेल. बारामतीमधील सर्व मतदारांना माझे आवाहन आहे की, त्यांनी सुनेत्रा पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करून दादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करावी.”
निवडणूक आयोगाकडे केली होती विचारणा
रुग्णालयात असतानाही मतदान करण्यासाठी पवारांनी प्रयत्न केले होते. त्यांनी निवडणूक आयोगाकडे ‘पोस्टल बॅलेट’ किंवा इतर पर्यायांची विचारणा केली होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव आणि निवडणूक नियमावलीनुसार असे पर्याय उपलब्ध नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी कळवले. त्यामुळे अखेर पवारांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.
मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत… — Sharad Pawar (@PawarSpeaks) April 21, 2026
हेही वाचा – Uday Samant : दादांच्या परीक्षेत पास झालो होतो, सामंतांचं गुलाबी उपरणे ठरले चर्चेचा विषय
बारामतीत सांगता सभेचा धडाका
एकीकडे शरद पवार रुग्णालयातून संदेश देत असताना, दुसरीकडे बारामतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. सर्वपक्षीय नेत्यांनी सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी आपली शक्ती उभी केली असून, आता बुधवारी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.