Shivsena UBT : मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपले राजीनामा पत्र थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले असून, त्यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय हालचाली आणि भाजपशी जवळीक
राजीनामा दिल्यानंतर शुभा राऊळ यांनी भाजपचे संकटमोचक मानले जाणारे नेते आशिष शेलार यांची भेट घेतली. ही भेट आमदार प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी पार पडली, ज्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. शुभा राऊळ यांनी केवळ पक्षाची साथच सोडली नाही, तर 'शिव आरोग्य सेने'च्या अध्यक्षपदाचाही त्याग केला आहे. त्यांच्या नाराजीचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असले, तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका प्रभावी महिला नेत्याने पक्षांतर करणे हे ठाकरेंसाठी चिंतेची बाब ठरू शकते.
ऐतिहासिक वचननाम्याच्या दिवशीच 'एक्झिट'
विशेष म्हणजे, ज्या दिवशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेऊन 'शब्द ठाकरेंचा' हा वचननामा प्रसिद्ध केला, त्याच दिवशी शुभा राऊळ यांनी राजीनामा दिला. तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे यांनी शिवसेना भवनात पाऊल ठेवले आणि ऐतिहासिक युतीची घोषणा केली. एका बाजूला ठाकरे बंधूंच्या युतीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच, दुसरीकडे माजी महापौरांनी दिलेला हा धक्का पक्षाच्या प्रतिमेला तडे देणारा ठरत आहे.
निवडणुकीच्या समीकरणांवर होणारा परिणाम
आगामी महापालिका निवडणुकीसाठी मुंबईकरांना पाळणाघरे, आरोग्य सुविधा आणि रोजगाराचे मोठे वायदे करणारा ठाकरेंचा हा वचननामा 'गेमचेंजर' ठरेल, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, शुभा राऊळ यांच्यासारख्या अनुभवी नेत्या भाजपच्या गोटात सामील झाल्यामुळे दक्षिण-मध्य मुंबईतील काही भागांत शिवसेनेच्या व्होट बँकेला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे नवीन युतीचे बळ मिळत असताना अंतर्गत गळती रोखण्याचे मोठे आव्हान आता उद्धव ठाकरेंसमोर उभे ठाकले आहे.
हेही वाचा – शिवसेना भवनात 'राज'दर्शन; 19 वर्षांनंतर ऐतिहासिक पुनरागमन आणि जुन्या संघर्षाच्या आठवणींना फुटला पाझर