BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 साठी राजकीय हालचालींनी वेग घेतला असून, काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. काँग्रेसने आज प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये बहुतांश नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी केल्यानंतर काँग्रेसने घेतलेला हा मोठा निर्णय मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रस्थापित वॉर्डांमध्ये आपली ताकद कायम ठेवतानाच नवीन समीकरणांच्या जोरावर सत्ता मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
बऱ्याच वर्षांनी काँग्रेस आणि प्रकास आंबेडकर यांचा पक्ष एत्र आला आहे. वंचित बहुजन आघाडीला मुंबई महानगरपालिकेतील 227 पैकी 62 जागा देण्यात आल्या आहेत. तर उर्वरित जागांवर काँग्रेस आणि काँग्रेसचे इतर मित्र पक्ष निवडणूक लढणार आहेत.
वंचितसोबतच्या युतीनंतर जागावाटपावर शिक्कामोर्तब
मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुढाकाराने काँग्रेसने पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीशी युती केली आहे. रविवारी या आघाडीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर, ज्या जागांवर कोणताही वाद किंवा तिढा नव्हता, अशा 87 जागांसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी सविस्तर चर्चा केल्यानंतर या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब केले. मुंबई महापालिकेवर आपली पकड मजबूत करण्यासाठी काँग्रेसने यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या सोबतीने मोठी रणनीती आखली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक – २०२६ साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा… आपली मुंबई घडवूया…
मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया..#Mission2026 #Mumbai… pic.twitter.com/y8X1hRLL1m — Mumbai Congress (@INCMumbai) December 29, 2025
हेही वाचा – Kishori Pednekar : किशोरी पेडणेकर यांना AB फॉर्म मिळाला नाही; मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट
घराणेशाहीची चर्चा: हंडोरे आणि शेख कुटुंबियांना उमेदवारी
काँग्रेसच्या या पहिल्या यादीत प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांना झुकते माप देण्यात आल्याचे दिसते. प्रभाग क्रमांक 140 मधून खासदार चंद्रकांत हंडोरे यांची कन्या प्रज्योती हंडोरे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, आमदार अस्लम शेख यांचा मुलगा आणि त्यांची बहीण यांनाही पक्षाने उमेदवारी जाहीर केली असून, या निवडीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
दुसरी यादी आणि अर्ज भरण्याची तयारी
सोमवारी रात्री उशिरा काँग्रेसची दुसरी उमेदवारी यादी जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. पहिल्या यादीतील उमेदवारांना सोमवारी रात्रीच ‘एबी’ (AB) फॉर्मचे वाटप केले जाणार असून, मंगळवारी हे सर्व उमेदवार आपले अधिकृत अर्ज दाखल करतील. दुसऱ्या यादीत आणखी किती नवीन चेहऱ्यांना संधी मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.