BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा ‘मेगाप्लॅन’ प्रसिद्ध! 35 लाख घरे आणि खड्डेमुक्त मुंबईचा निर्धार

महायुतीने या जाहीरनाम्याद्वारे मध्यमवर्गीय मराठी माणूस, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठी खेळी खेळली आहे.

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा ‘मेगाप्लॅन’ प्रसिद्ध! 35 लाख घरे आणि खड्डेमुक्त मुंबईचा निर्धार

Mahayuti Manifesto for BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी अवघे 4 दिवस शिल्लक असून, 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानासाठी राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप-शिवसेना-रिपाइं ‘महायुती’ने आज आपला अधिकृत जाहीरनामा (वचननामा) प्रसिद्ध केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वचननाम्यातून मुंबईचा कायापालट करण्याचा आणि ‘मराठी अस्मिता’ जपण्याचा शब्द दिला आहे. महायुतीने या जाहीरनाम्याद्वारे मध्यमवर्गीय मराठी माणूस, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठी खेळी खेळली आहे.

गृहनिर्माण आणि हक्काच्या घरांचा संकल्प
मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा शहरात आणण्यासाठी आणि हक्काचे घर मिळावे, यासाठी महायुतीने गृहनिर्माण क्षेत्रात मोठी क्रांती करण्याचे आश्वासन दिले आहे. यातील प्रमुख योजना खालीलप्रमाणे आहेत:

– पुढील 5 वर्षांत शहरात 30 ते 35 लाख नवीन घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
– मुंबईतील जुन्या इमारतींमधील ‘पागडी’ पद्धत कायमची बंद करून भाडेकरूंना मालकी हक्काची घरे मिळवून दिली जातील.
– विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र (OC) रखडलेल्या 20 हजार इमारतींचा प्रश्न तातडीने मार्गी लावला जाईल.
– सफाई कामगारांना हक्काची घरे दिली जातील आणि पोलिसांच्या जीर्ण घरांच्या पुनर्विकासाला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

वाहतूक आणि पायाभूत सुविधांचा कायापालट
मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासातील कटकट दूर करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी ‘यूटिलिटी टनेल’ सारख्या संकल्पना जाहीरनाम्यात मांडण्यात आल्या आहेत.

– 9 मीटरपेक्षा जास्त रुंदीचे सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करून मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त केली जाईल. वारंवार होणारे रस्ते खोदकाम टाळण्यासाठी 17 नागरी सेवांसाठी जमिनीखाली विशेष बोगदे तयार केले जातील.
– पुढील 5 वर्षे दरवर्षी होणारी 8% पाणीपट्टी वाढ पूर्णपणे स्थगित करण्यात येईल, ज्यामुळे मुंबईकरांना आर्थिक दिलासा मिळेल.
– महिलांना ‘बेस्ट’ बसच्या प्रवासात 50% सवलत दिली जाईल आणि 2029 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात 10,000 नवीन इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट केल्या जातील.

हेही वाचा – Nitesh Rane : मोठी बातमी! नितेश राणेंच्या ‘सुवर्णगड’ बंगल्याबाहेर संशयास्पद बॅग; घातपाताचा संशय? मुंबई पोलीस सतर्क

आरोग्य आणि सामाजिक कल्याण योजना
आरोग्य व्यवस्थेत ‘आपला दवाखाना’ योजनेचा विस्तार करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि महिलांसाठी विशेष सोयी जाहीर करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या रुग्णालयांत 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना वर्षातून एकदा मोफत ‘फुल बॉडी चेकअप’ची सुविधा दिली जाईल. तसेच, आरोग्य शिक्षणाच्या संधी वाढवण्यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ’ उभारण्यात येईल. झोपडपट्टी भागात स्वच्छता सुधारण्यासाठी ‘मागेल त्याला शौचालय’ हे धोरण राबवले जाईल आणि जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने मुंबईला 5 वर्षांत पूर्णपणे पूरमुक्त (Flood-free) करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

मराठी अस्मिता आणि पारदर्शक प्रशासन
मराठी भाषेला सन्मान देण्यासाठी महानगरपालिकेत स्वतंत्र ‘मराठी भाषा विभाग’ स्थापन केला जाणार असून, मराठी तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी विशेष प्रोत्साहन धोरण आखले जाईल. प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला लगाम लावण्यासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. सुरक्षिततेच्या मुद्द्यावर, बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना बाहेर काढून मुंबई ‘घुसखोरमुक्त’ करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी हुतात्मा स्मारकात जागतिक दर्जाचे संग्रहालय उभारणे, हे देखील या वचननाम्यातील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचा – Mira Bhayandar Election: मिरा-भाईंदरमध्ये प्रताप सरनाईकांनी गेम फिरवला; भाजपच्या ‘या’ तीन दिग्गज नगरसेवकांनी धरली शिंदे गट शिवसेनेची वाट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number