Goregaon Riot : गोरेगावमध्ये राडा; शोभायात्रेवर हल्ला करणाऱ्या दंगलखोरांच्या घरांवर चालला ‘बुलडोझर’; पालिकेची मोठी कारवाई

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिंडोशी येथील घटनेची गंभीर दखल घेत ड्रग्ज माफियांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Goregaon Riot : गोरेगावमध्ये राडा; शोभायात्रेवर हल्ला करणाऱ्या दंगलखोरांच्या घरांवर चालला ‘बुलडोझर’;  पालिकेची मोठी कारवाई

Mumbai Goregaon News : मुंबईच्या गोरेगाव पूर्व भागातील दिंडोशी संतोष नगर परिसरात रविवारी, 5 एप्रिल रोजी मरियम्मा देवीच्या शोभायात्रेदरम्यान दोन गटांत भीषण राडा झाला. या हिंसक घटनेत दोन्ही बाजूंनी जोरदार हाणामारी झाली असून, यात सुमारे 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी तत्परता दाखवत मध्यरात्रीच 8 संशयित दंगलखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. या राड्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दंगलखोरांच्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा
या हिंसेला उत्तर म्हणून मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता कठोर पवित्रा घेतला आहे. शोभायात्रेवर हल्ला करणाऱ्या आरोपींच्या अनधिकृत घरांवर आणि दुकानांवर पालिकेच्या वतीने जेसीबी आणि बुलडोझर चालवण्यात येत आहे. प्रशासनाला या बांधकामांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, ज्याची दखल घेत ही तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. भररस्त्यात कायदा हातात घेणाऱ्यांवर जरब बसवण्यासाठी पालिकेने ही पावले उचलल्याचे बोलले जात आहे. कारवाईच्या ठिकाणी पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा तगडा पहारा असून, दंगलखोरांच्या अवैध साम्राज्यावर आता हातोडा पडत आहे.
 

हेही वाचा – Karuna Munde: बारामती पोटनिवडणुकीत ट्विस्ट; सुनेत्रा पवारांविरुद्ध करुणा मुंडेंनी ठोकला शड्डू, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

गाण्यावरून वाद आणि तलवारींनी हल्ला
या वादाची ठिणगी शोभायात्रेमध्ये वाजवल्या जाणाऱ्या प्रभू रामांच्या गाण्यावरून पडल्याचे समोर आले आहे. एका विशिष्ट गटाने या गाण्यांना विरोध केला, ज्याचे रूपांतर नंतर मोठ्या हिंसाचारात झाले. बजरंग दलाच्या दाव्यानुसार, हिंदू शोभायात्रेवर अचानक तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला चढवण्यात आला. यामध्ये बजरंग दलाचे 3 कार्यकर्ते गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बजरंग दल कोकण प्रांताचे सहसंयोजक गौतम रावारीया यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला असून प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली होती.

हनुमान चालीसा पठणावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांत जुंपली
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी मोठ्या संख्येने गोळा झाले आहेत. ज्या ठिकाणी शोभायात्रेवर हल्ला झाला होता, त्याच ठिकाणी सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्याच्या निर्णयावर कार्यकर्ते ठाम आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही आक्रमक पवित्रा घेत आपण स्वतः या हनुमान चालिसा पठणात सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, यामुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ शकतो, असे सांगत पोलिसांनी त्यांना बाहेर पठण करण्याची विनंती केली आहे. यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. ही कारवाई केवळ दिखाव्यासाठी नसावी, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेऊ, असा इशाराही यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे.

राजकीय प्रतिक्रिया आणि सध्याची स्थिती
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पालिकेच्या या कारवाईचे समर्थन केले असून दोषींवर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. सध्यातरी संतोष नगर परिसरात तणावपूर्ण शांतता असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे. 8 आरोपींच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील इतर धागेदोरे शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.

हेही वाचा – Anjali Damania on Kharat Case : खरात प्रकरणावरून दमानिया पुन्हा एकदा आक्रमक; सीडीआरचा धमाका,चाकणकरांसह बड्या नेत्यांचे धाबे दणाणले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number