Crime News: नवे आयुष्य सुरू करण्याचे स्वप्न, प्रियकरासाठी केलेली कोट्यवधींची चोरी आणि अखेर हॉटेलच्या खोलीत झालेला विश्वासघात… एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभेल अशा एका सत्य घटनेचा पर्दाफाश अहमदाबाद गुन्हे शाखेने केला आहे. एका नामांकित ज्वेलरी शॉपमध्ये सेल्सवुमन म्हणून काम करणाऱ्या तरुणीला आणि तिच्या विवाहित प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, चोरीला गेलेल्या 1.66 कोटी रुपयांच्या दागिन्यांचा मोठा हिस्सा शोधणे पोलिसांसमोर अद्यापही मोठे आव्हान आहे.
मालक जेवायला गेले अन् तिने डाव साधला
अहमदाबादच्या निकोल परिसरातील 'ग्रॅव्हिटी शॉपिंग मॉल'मध्ये 'अनमोल सर्कल'जवळ दर्शन शाह यांचे दागिन्यांचे शोरुम आहे. येथे गेल्या 11 महिन्यांपासून हर्षिदा शेट्टी नावाची तरुणी सेल्सगर्ल म्हणून कार्यरत होती. 11 मे रोजी दुपारी जेव्हा शोरुमचे मालक जेवण्यासाठी बाहेर पडले, नेमकी तीच संधी साधून हर्षिदाने आपला प्लॅन अंमलात आणला. नेहमीप्रमाणे काम करत असल्याचा बहाणा करत तिने डिस्प्ले ट्रे आणि लॉकरमधून सोन्याचे दागिने, हिऱ्यांचे दागिने, मंगळसूत्रे आणि सोनसाखळ्या लंपास केल्या. दुपारी साडेचारच्या सुमारास हे सर्व दागिने बॅग आणि युनिफॉर्ममध्ये लपवून ती शोरुममधून पसार झाली.
एका सोन्याच्या नाण्याने उघड केला गुन्हा
त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास एक ग्राहक दुकानात आला असता, कांजी पटेल नावाच्या एका सतर्क कर्मचाऱ्याला ट्रेमधील सोन्याचे नाणे कमी असल्याचे जाणवले. त्यांनी तातडीने ही बाब मालक दर्शन शाह यांच्या निदर्शनास आणून दिली. हर्षिदाने काही वेळापूर्वीच घरगुती कारणास्तव लवकर सोडण्याची विनंती केली होती, जी मालकांनी फेटाळली होती. संशय बळावल्याने जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तेव्हा हर्षिदाची चोरी कॅमेऱ्यात कैद झाल्याचे उघड झाले.
आंघोळीच्या 'त्या' काही मिनिटांत गेम पालटला
चोरी केल्यानंतर हर्षिदा तिच्या विवाहित प्रियकरासोबत थेट उत्तर भारताच्या सफरीवर निघाली. चोरीच्या पैशांवर आणि दागिन्यांवर दोघांनी अनेक थंड हवेच्या ठिकाणी आणि आलिशान हॉटेल्समध्ये मुक्काम केला. दोघेही नव्या संसाराची स्वप्ने पाहत होते, पण एका हॉटेलमध्ये या कथेला अनपेक्षित वळण मिळाले. हर्षिदा जेव्हा बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, नेमकी तीच संधी साधून तिच्या प्रियकराने तिला दगा दिला. तो खोलीत ठेवलेले बहुतांश दागिने घेऊन तिला वाऱ्यावर सोडून पळून गेला.
फसवणुकीच्या रागातून पोलिसांना दिली माहिती
आपल्याच प्रियकराने आपल्याला लुबाडल्याचे लक्षात आल्यावर हर्षिदा पुरती कोलमडली. फसवणुकीच्या रागातून तिने स्वतः पोलीस यंत्रणेशी संपर्क साधला आणि प्रियकराचा संपूर्ण माग पोलिसांना दिला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. चोरीचे काही दागिने सराफाला विकण्याच्या प्रयत्नात असताना हर्षिदाही पोलिसांच्या जाळ्यात अडकली. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून गायब झालेले दागिने हस्तगत करण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत.