ED Raids: बेनामी जमिनी अन् बार-रेस्टॉरंटमधून काळा पैसा? मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणाऱ्या बड्या मंत्र्यांचे जावई ED च्या जाळ्यात

राज्याचे वजनदार नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे जावई वाय मंजुनाथ यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (ED) अचानक धाडी टाकल्या आहेत.

ED Raids: बेनामी जमिनी अन् बार-रेस्टॉरंटमधून काळा पैसा? मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणाऱ्या बड्या मंत्र्यांचे जावई ED च्या जाळ्यात

ED Raids:  कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात सध्या एका मोठ्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. राज्याचे वजनदार नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे जावई वाय मंजुनाथ यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (ED) अचानक धाडी टाकल्या आहेत. मंजुनाथ हे बेळगावचे अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. 'ईडी'च्या पथकांनी बेळगाव, बंगळूर, म्हैसूर आणि आरसिकेरे यांसारख्या 6 महत्त्वाच्या ठिकाणांवर एकाच वेळी धडक कारवाई सत्र सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वीच सतीश जारकीहोळी यांचे नाव कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते, त्यामुळे या कारवाईला मोठे राजकीय गांभीर्य आले आहे.

मित्रांची घरे आणि अपार्टमेंट्स 'ईडी'च्या रडारवर
केंद्रीय तपास यंत्रणेने या कारवाईचा पाश कमालीचा आवळला आहे. वाय मंजुनाथ यांच्या बेळगावमधील निवासस्थानासोबतच त्यांच्या निकटवर्तीयांनाही या तपासाची झळ बसली आहे. 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी मंजुनाथ यांच्या म्हैसूरमधील एका मित्राच्या घरावर, बंगळूरमधील आलिशान अपार्टमेंटवर, हसन जिल्ह्यातील आरसिकेरे येथील एका जवळच्या सहकाऱ्याच्या घरावर तसेच अथणी तालुक्यातील ऐनापूर गावातील मित्राच्या निवासस्थानी छापे टाकले आहेत. या झाडाझडती दरम्यान तपास यंत्रणेच्या हाती अनेक महत्त्वाची आणि संशयास्पद कागदपत्रे लागल्याची सूत्रे माहिती देत आहेत. या छाप्यांविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हेही वाचा – Air India Flight: अमृतसर हुकलं अन् विमान थेट पाकिस्तानात शिरलं… मार्ग भरकटलेल्या एअर इंडियाच्या विमानाने पाकिस्तानातून घेतला यू-टर्न

बेनामी मालमत्ता आणि बार-रेस्टॉरंटच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार?
बेल्लारीचे माजी खासदार देवेंद्रप्पा यांचे सुपुत्र असलेल्या वाय मंजुनाथ यांच्यावर बेनामी पद्धतीचा अवलंब करून अफाट संपत्ती गोळा केल्याचा संशय आहे. बेनामी नावांवर मोठ्या जमिनी खरेदी करणे, बार आणि रेस्टॉरंट्सच्या व्यवसायातून काळा पैसा पांढरा करणे आणि अवैध मालमत्ता जमवणे, असे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. उत्तर कर्नाटक आणि बेळगाव भागात प्रचंड दबदबा असणाऱ्या जारकीहोळी परिवाराशी संबंधित या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले असून, या चौकशीअंती काय निष्पन्न होणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number