BJP Office Attack: पंजाबमधील संगरूर येथे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) जिल्हा कार्यालयाला लक्ष्य करत अज्ञातांनी पेट्रोल बॉम्बने हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुदैवाने, घटनेच्या वेळी इमारतीमध्ये कोणीही उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली. सोमवारी सकाळी जेव्हा पक्षकर्ते कार्यालय उघडण्यासाठी पोहोचले, तेव्हा संपूर्ण प्रकार निदर्शनास आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंतेत भर पडली आहे. याआधी चंदीगड येथील भाजप कार्यालयालाही अशाच प्रकारे लक्ष्य करण्यात आले होते.
#WATCH | Sangrur, Punjab: Davinder Atri (SP-D Sangrur) says, "…DSP, Sangrur SHO and I reached here. We are inspecting the spot. Petrol was filled in a beer bottle to convert it into a petrol bomb…We are lodging an FIR against the culprits, and we will take action againt… https://t.co/94cd7f1ktE pic.twitter.com/pTEnZhUPAy — ANI (@ANI) July 27, 2026
तपासासाठी पोलिसांची पथके तैनात; आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास यंत्रणा सतर्क केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक (SP) दविंदर अत्री यांनी स्पष्ट केले की, पेट्रोलने भरलेली बिअरची बाटली कार्यालयाच्या दिशेने फेकून पेटवण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला असून, दोषींना गजाआड करण्यासाठी पोलिसांची वेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत.
“राज्यात कायदा व सुव्यवस्था कोलमडली”: भाजप नेत्यांचा सरकारवर प्रहार
या हल्ल्यानंतर स्थानिक भाजपने राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप नेते रणदीप सिंग देओल यांनी आरोप केला की, हा हल्ला पक्षाचे कार्यालय पूर्णपणे जाळून खाक करण्याच्या उद्देशानेच करण्यात आला होता आणि ही घटना थेट प्रशासकीय अपयशाचे लक्षण आहे. तर नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मनिंदर सिंग यांनी प्रदेशाध्यक्ष केवल सिंग ढिल्लन यांना घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली आहे. पंजाबमध्ये आता पोलीस ठाणी आणि राजकीय कार्यालयेही सुरक्षित राहिलेली नाहीत, असा थेट घणाघात भाजपकडून करण्यात आला आहे.