BJP MLA Ameet Satam on Thyackeray Brothers :मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि आता ठाकरे बंधू यांच्यात कलगीतुरा रंगला असून भाजपने थेट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आणि पूर्वीच्या कारभारावर हल्लाबोल सुरू केला आहे. मुंबईच्या विकासकामांचे श्रेय घेण्यावरून सुरू असलेल्या वादात आता भ्रष्टाचार आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टोकदार टीका केली जात आहे.
अमित साटम यांचे गंभीर आरोप
या सर्व आरोप-प्रत्यारोपांदरम्यान भाजप आमदार अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंवर देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. साटम यांच्या मते, 1997 ते 2022 या 25 वर्षांच्या काळात मुंबई महानगरपालिकेत तब्बल 3 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, जो देशातील 2G किंवा कोळसा घोटाळ्यापेक्षाही मोठा आहे. मुंबईची पाण्याची वाढती गरज लक्षात घेता गारगाई-पिंजळ प्रकल्प होणे अत्यंत आवश्यक होते; मात्र, उद्धव ठाकरेंनी केवळ ‘बालहट्टापायी’ हा महत्त्वाचा प्रकल्प रद्द करून मुंबईकरांचे नुकसान केले, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही साटम यांनी ठाकरेंना धारेवर धरले. त्यांनी म्हटले की, हिंदुत्वाला तिलांजली दिल्यामुळेच शिवसेनेच्या 90 टक्के आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली आणि सत्तेला लाथ मारली. शेवटी त्यांनी एक मोठा आरोप करत वादग्रस्त विधान केले, ज्यावरून पुढेही एकमेकांवर आरोप होत राहतील. त्यांनी असे म्हटले की, जर मुंबईत पुन्हा उद्धव ठाकरेंचा महापौर झाला, तर मुंबईचे ‘पाकिस्तान’ व्हायला वेळ लागणार नाही.
हेही वाचा – Shivsena UBT : ऐन निवडणुकीत ठाकरेसेनेला खिंडार! माजी महापौरांचा राजीनामा; भाजप प्रवेश निश्चित?
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा उल्लेख ‘श्रेय चोरणारी टोळी’ असा केला आहे. मुंबईत सध्या ही टोळी सक्रिय झाली असून कोस्टल रोड आणि मेट्रो सारख्या प्रकल्पांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा टोला त्यांनी लगावला. या टोळीमध्ये काही ‘अबोध बालकं’ (आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात सूचक विधान) असून, त्यांना वाटते की, सर्व काही त्यांनीच केले आहे, मात्र जनता सर्व काही जाणून आहे, असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
मुंबई महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक ही केवळ सत्तेची लढाई नसून ती वर्चस्वाची लढाई बनली आहे. अमित साटम आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपने निवडणुकीचा अजेंडा स्पष्ट केला आहे. भ्रष्टाचार, रखडलेले पाणी प्रकल्प आणि हिंदुत्वाचा त्याग या मुद्द्यांभोवती ही निवडणूक फिरण्याची चिन्हे आहेत. आता उद्धव ठाकरेंच्या ‘शब्द’ आणि महायुतीच्या ‘कामांचा हिशोब’ यामध्ये मुंबईकर कुणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.