Baramati Byelection 2026: बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली कंबर कसली असून 40 दिग्गज नेत्यांची 'स्टार प्रचारक' म्हणून अधिकृत यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने माघार घेतल्याने सुनेत्रा पवार यांचा मार्ग सुकर वाटत असला, तरी रिंगणात अद्याप 23 अपक्ष उमेदवार असल्याने भाजपने कोणतीही जोखीम न पत्करण्याचे ठरवले आहे. केंद्रीय कार्यालयाने ही यादी निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केली आहे.
पवार विरोधक पडळकर आता सुनेत्रा पवारांसाठी मते मागणार
भाजपच्या या यादीत सर्वात चर्चेत असलेले नाव म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर. पवार कुटुंबावर नेहमी घणाघाती टीका करणारे आणि पूर्वी थेट अजित पवारांविरुद्ध निवडणूक लढवणारे पडळकर आता त्याच पवार कुटुंबाच्या सुनेसाठी म्हणजेच सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीत सभा घेताना दिसणार आहेत. 'महायुती'चा धर्म पाळत जुने राजकीय वैर बाजूला सारून पडळकर बारामतीच्या मैदानात कशी फटकेबाजी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गज नेत्यांच्या ताफा धडाडणार
प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी भाजपने राज्यातील आपल्या सर्व प्रमुख चेहऱ्यांना मैदानात उतरवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रा वाघ, मेघना बोर्डीकर, भारती पवार आणि मोनिका राजळे या महिला नेत्यांच्या विशेष सभांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय प्रवीण दरेकर, धनंजय महाडिक, डॉ. भागवत कराड, डॉ. सुजय विखे पाटील, अतुल सावे, योगेश टिळेकर आणि राहुल कुल या अनुभवी नेत्यांचाही या ताफ्यात समावेश आहे.
रेकॉर्डब्रेक मताधिक्यासाठी भाजपचा धडाका
बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. काँग्रेसच्या माघारीनंतरही अपक्ष उमेदवारांच्या संख्येमुळे तांत्रिकदृष्ट्या निवडणूक होत आहे. महायुतीची मते विखुरली जाऊ नयेत आणि सुनेत्रा पवार यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य मिळावे, यासाठी भाजपने ही 40 नेत्यांची फौज धाडली आहे. भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे बारामती आणि राहुरीमध्ये राजकीय सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. विशेषतः गोपीचंद पडळकर यांच्या भाषणांची बारामतीकरांमध्ये आतापासूनच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.