BJP Win In Ichalkaranji : इचलकरंजीवर भाजपचे ‘एकहाती’ वर्चस्व; राज्याचा पहिला संपूर्ण निकाल जाहीर

नव्याने निर्माण झालेल्या या महानगरपालिकेच्या पहिल्याच ऐतिहासिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विरोधकांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला आहे.

BJP Win In Ichalkaranji : इचलकरंजीवर भाजपचे ‘एकहाती’ वर्चस्व; राज्याचा पहिला संपूर्ण निकाल जाहीर

BJP Win In Ichalkaranji :  महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या रणधुमाळीत इचलकरंजी महानगरपालिकेने बाजी मारत राज्याचा पहिला संपूर्ण निकाल सादर केला आहे. नव्याने निर्माण झालेल्या या महानगरपालिकेच्या पहिल्याच ऐतिहासिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विरोधकांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला आहे. 65 जागांपैकी तब्बल 43 जागा जिंकून भाजपने इचलकरंजीच्या सत्तेची चावी स्वतःकडे घेतली आहे.

बलाबल आणि राजकीय चित्र

इचलकरंजीतील ही निवडणूक प्रामुख्याने महायुती आणि स्थानिक 'शिव-शाहू विकास आघाडी' यांच्यात झाली. 16 प्रभागांमधील 65 जागांसाठी एकूण 230 उमेदवार मैदानात होते. निकालाच्या अंतिम आकडेवारीनुसार, भाजपने 43 जागांसह निर्भेळ यश मिळवले आहे. दुसरीकडे, शिव-शाहू आघाडीला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले. महायुतीमधील इतर घटक पक्षांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 3 जागा, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 1 जागा जिंकली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही केवळ 1 जागेवर विजय मिळवता आला.

प्रभागनिहाय प्रमुख निकाल आणि विजेते 

निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये भाजपची लाट पाहायला मिळाली. प्रभाग क्रमांक 6, 9, 11, 12, 14 आणि 15 मध्ये भाजपच्या सर्वच उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत 'क्लीन स्वीप' दिला आहे. प्रभाग 12 मध्ये नितेश पोवार, सुरेखा जाधव, स्नेहल रावळ आणि अनिल डाळ्या यांनी विजयाची मोहोर उमटवली. प्रभाग 3 मध्ये भाजपच्या प्रियंका इंगवले आणि योगेश पाटील यांनी विजय मिळवला, तर याच प्रभागातून शिंदे सेनेच्या सरिता आवळे आणि राष्ट्रवादीच्या अशोक जांभळे यांनीही बाजी मारली. प्रभाग 1 आणि 2 मध्ये मात्र शिव-शाहू आघाडीचा दबदबा पाहायला मिळाला, जिथे स्वाती लोखंडे, सचिन राणे, रूपाली कोकणे आणि उदयसिंह पाटील यांच्यासह इतर उमेदवारांनी विजय मिळवला.

हेही वाचा – Jalna Municipal Election Result: गौरी लंकेश मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी श्रीकांत पांगारकर महापालिकेत विजयी

दिग्गजांना बसला पराभवाचा धक्का

या निवडणुकीत अनेक जुन्या आणि मातब्बर नेत्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. पराभूत झालेल्या प्रमुख चेहऱ्यांमध्ये शिव-शाहू आघाडीचे प्रकाश मोरबाळे, राहुल खंजिरे आणि संजय कांबळे यांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुहास जांभळे आणि मंगला मुसळे यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. विशेष म्हणजे, महायुतीमधील शिंदे सेनेचे रवींद्र लोहार आणि भाजपचे किसन शिंदे यांसारख्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनाही मतदारांनी नाकारले आहे.

हेही वाचा – Thane Election Results 2026 : एकनाथ शिंदेंनी ठाण्याचा गड राखला; सुषमा अंधारेंची निकालावर तिखट प्रतिक्रिया

दरम्यान, इचलकरंजी महानगरपालिकेच्या रूपाने राज्याला आज पहिला स्पष्ट जनादेश मिळाला आहे. सत्तेसाठी लागणारा बहुमताचा आकडा भाजपने स्वतःच्या बळावर पार केल्यामुळे शहरात गुलालाची उधळण सुरू झाली आहे. इचलकरंजीच्या वस्त्रनगरीने विकासाच्या मुद्द्यावर भाजपला कौल दिल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number