Delhi MCD Mayor: दिल्ली महानगरपालिकेच्या (MCD) महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) वर्चस्व गाजवत दणदणीत विजय मिळवला आहे. ज्येष्ठ नगरसेवक प्रवेश वाही यांची दिल्लीचे नवीन महापौर म्हणून निवड करण्यात आली असून, त्यांनी काँग्रेसचे उमेदवार जहीर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. महापौरपदाच्या या निवडणुकीत एकूण 165 खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी मतदान केले आणि सर्व मते वैध ठरली. यामध्ये प्रवेश वाही यांना 156 मते मिळाली, तर जहीर यांना केवळ 9 मते मिळाली. अशा प्रकारे वाही यांनी 147 मतांच्या ऐतिहासिक फरकाने विजय नोंदवला. विशेष म्हणजे, उपमहापौरपदासाठी भाजपच्या मोनिका पंत यांची बिनविरोध निवड झाली आहे.
'आप'चा निवडणुकीवर बहिष्कार; स्थायी समितीवर मात्र लक्ष
या महत्त्वाच्या निवडणुकीवर आम आदमी पार्टीने (आप) बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मतदान सुरू असताना पक्षाचे नगरसेवक आणि खासदार सभागृहात उपस्थित नव्हते. मात्र, स्थायी समितीच्या निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय 'आप'ने घेतला आहे. स्थायी समितीच्या 3 जागांसाठी केवळ 3 अर्ज आल्याने निवडणूक ही आता केवळ औपचारिकता उरली आहे. यामध्ये भाजपचे 2 आणि 'आप'चा 1 सदस्य बिनविरोध निवडून येण्याची चिन्हे आहेत. समितीवर आपले प्रतिनिधित्व असावे, या उद्देशाने 'आप'ने केवळ या प्रक्रियेत सहभागी होण्याचे ठरवले आहे.
MCD महापौर निवडणुकीचे गणित आणि भाजपचे पारडे
MCD मध्ये एकूण 273 मते असतात, ज्यात 249 नगरसेवक (एका प्रभागातील जागा रिक्त असल्याने सध्या संख्या 249 आहे), 7 लोकसभा खासदार, 3 राज्यसभा सदस्य आणि 14 नामनिर्देशित आमदारांचा समावेश आहे. बहुमतासाठी किमान 137 मतांची आवश्यकता असते. या निवडणुकीत भाजपला 156 मते मिळाली. भाजपकडे स्वतःचे 123 नगरसेवक, 7 खासदार आणि 11 आमदारांचे पाठबळ आहे. स्वाती मालीवाल यांच्या भाजप प्रवेशानंतर पक्षाचे संख्याबळ 142 वर पोहोचले आहे, जे बहुमताच्या आकड्यापेक्षा अधिक आहे. याउलट, 'आप'कडे 100 नगरसेवक असून, इतर पक्षांची संख्या तुलनेने कमी आहे.
अनुभवी नेतृत्वाकडे दिल्लीची धुरा
नवनिर्वाचित महापौर प्रवेश वाही यांच्याकडे प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी 'उत्तर दिल्ली महानगरपालिकेत' 'विभाग अध्यक्ष' (Zone Chairman) म्हणून 3 कार्यकाळ काम पाहिले आहे. तसेच त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवले असून, सध्या ते 'रोहिणी-बी' प्रभागाचे नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा दिल्लीच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.