Rohit Shetty Firing Case: प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने चित्रपट सृष्टीसह संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून, तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी सहा आरोपींना राजस्थानमध्ये शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली असून, अटक केलेल्या या सहा जणांना आता मुंबईत आणले जात आहे.
तपासाचा घेरा वाढला; अटकेतील आरोपींची संख्या 11 वर
या प्रकरणाचा तपास करत असताना मुंबई गुन्हे शाखेने तांत्रिक पुरावे आणि गुप्तचरांच्या मदतीने आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. सुरुवातीच्या तपासात काही जणांना ताब्यात घेण्यात आले होते, मात्र राजस्थानमधील या सहा आरोपींच्या अटकेनंतर आता या कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या सहा नवीन अटकेसह आतापर्यंत एकूण 11 जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या सर्वांची सखोल चौकशी केल्यानंतर गोळीबारामागचा खरा हेतू आणि यात कोणत्या गँगचा हात आहे, याचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Firing incident outside Rohit Shetty's house | Six more accused arrested in connection with the firing. They have been arrested from Rajasthan and are being brought to Mumbai: Mumbai Crime Branch A total of 11 people have been arrested so far. — ANI (@ANI) February 16, 2026
राजस्थान कनेक्शन आणि पुढील कारवाई
अटक करण्यात आलेले आरोपी राजस्थानमधील कोणत्या भागातील आहेत आणि ते रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात थेट सहभागी होते की त्यांनी केवळ मदत केली होती, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या आरोपींना मुंबईत आणल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाईल आणि त्यांची पोलीस कोठडी मागितली जाईल. या घटनेमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, मुंबई पोलीस या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.