Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांच्या पक्षाबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे पवार गट सत्ताधारी एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या बातम्यांना उधाण आले असताना, दुसरीकडे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पक्षाने अचानक एक अत्यंत मोठा आणि धक्कादायक प्रशासकीय निर्णय घेतला आहे. पक्षाने जारी केलेल्या एका तातडीच्या आदेशामुळे सध्या संपूर्ण राज्यभरातील राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.
पक्षाकडून ‘फ्लॅश मेसेज’; महेश तपासे आणि विद्या चव्हाण यांच्यावरच मोठी जबाबदारी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या सर्व अधिकृत प्रवक्त्यांची पदे तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात आली आहेत. यापुढे केवळ दोनच नेते माध्यमांसमोर पक्षाची अधिकृत बाजू मांडतील. यामध्ये माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे या दोन वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. पक्षाची भूमिका अधिक स्पष्ट आणि शिस्तबद्ध पद्धतीने मांडण्यासाठीच हा अचानक बदल करण्यात आल्याचे मानले जात आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री मा. श्री. शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने, आज दि. ४ ऑगस्ट २०२६ पासून यापूर्वी पक्षाच्या प्रवक्तापदासाठी करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या पुढील आदेश होईपर्यंत तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत आहेत. तसेच, या कालावधीत माजी आमदार मा. श्रीमती… pic.twitter.com/CLlH87a5pt — Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 4, 2026
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचे अधिकृत पत्र; निर्णयामागे नक्की काय कारण?
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या स्वाक्षरीने हे महत्त्वाचे आदेश पत्र जारी करण्यात आले आहे. या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, 4 ऑगस्ट 2026 पासून पक्षाच्या प्रवक्ता पदावर असलेल्या सर्व नेत्यांच्या नियुक्त्या पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे रद्द करण्यात येत आहेत. या काळात केवळ विद्या चव्हाण आणि महेश तपासे हेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील. एकाच वेळी सर्व प्रवक्त्यांना हटवून केवळ दोनच नेत्यांवर ही जबाबदारी का सोपवण्यात आली, यामागे आगामी राजकीय घडामोडींची काही रणनीती आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.