Bawankule On Raj-Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीमुळे राज्याचे राजकारण तापलेले असतानाच, भारतीय जनता पक्षाने यावर अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ‘कुणीही कितीही गळाभेटी घेतल्या किंवा एकत्र आले, तरी त्याचा भाजप आणि महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. मुंबईत भाजपचाच महापौर बसेल,’ असा ठाम विश्वास राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केली. ते म्हणाले, ‘मुंबईकर आता केवळ भावनिक साद आणि ‘मराठी-मराठी’ या राजकारणाला भुलणार नाहीत. जनतेला विकास हवा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या ‘विकास मॉडेल’वर लोकांचा विश्वास असून, आगामी निवडणुकीत 51 टक्के मुंबईकर महायुतीच्या पारड्यात मते टाकतील. 2047 पर्यंतची प्रगत मुंबई कशी असेल, याचा आराखडा केवळ भाजपकडेच असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
हेही वाचा – Sanjay Raut On Thackeray Alliance: राज आणि उद्धव ठाकरे यांची युती; राऊत म्हणाले, ‘राम-लक्ष्मण एकत्र आलेत’
‘आमच्याकडे विकास, त्यांच्याकडे भकास’ – बावनकुळे
ठाकरे गटावर थेट निशाणा साधताना बावनकुळे म्हणाले, मुंबईवर 25 वर्षे ज्यांचा महापौर होता, त्यांनी शहरासाठी काय केले? 2014 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले, तेव्हापासून खऱ्या अर्थाने मुंबईचा चेहरा बदलला आहे. आज जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना बदललेली आणि प्रगत मुंबई दिसत आहे. त्यामुळे जनता आता ‘भकास’ राजकारण करणाऱ्यांना थारा देणार नाही.
‘ठाकरेंची नौटंकी आता चालणार नाही’
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याला बावनकुळे यांनी ‘नौटंकी’ असे संबोधले. जनतेपासून हे नेते आता दूर गेले आहेत. भावनिक भाषणे करून मते मिळवण्याचे दिवस संपले आहेत. जनतेला तुमचे व्हिजन हवे आहे, जे तुमच्याकडे नाही. कितीही नेते एकत्र आले तरी मतदारांचा कौल विकासालाच असेल, अशी टीका त्यांनी केली.