Abhijeet Dipke: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणशिंग; अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला अंजली दमानियांचा पाठिंबा

6 जून रोजी भारतात परतल्यानंतर दिल्लीत आंदोलन सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, विद्यार्थी आणि समर्थकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.<br/>

Abhijeet Dipke: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणशिंग; अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला अंजली दमानियांचा पाठिंबा

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी विविध राष्ट्रीय परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत शांततापूर्ण आंदोलनाची घोषणा केली आहे. 6 जून रोजी भारतात परतल्यानंतर दिल्लीत आंदोलन सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, विद्यार्थी आणि समर्थकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

अंजली दमानिया यांचा पाठिंबा; दिल्ली दौऱ्याची घोषणा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही अभिजीत दिपके यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरील पोस्टमध्ये आपण 6 जून रोजी दिल्लीला रवाना होणार असल्याचे जाहीर केले. “अभिजीत दिपके आणि राष्ट्राच्या भवितव्याची काळजी करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मी दिल्लीला जात आहे,” असे त्यांनी म्हटले. ‘विकसित भारत’ ही केवळ घोषणा नसून एक राष्ट्रीय ध्येय असल्याचे नमूद करत त्यांनी देशासाठी स्पष्ट दृष्टीकोन आणि विकासाचा रोडमॅप असलेल्या नेतृत्वाची गरज व्यक्त केली.

युवकांशी संवाद साधण्याचे आवाहन

अंजली दमानिया यांनी आपल्या संदेशात राजकीय नेतृत्वाला युवकांशी संवाद साधण्याचे आवाहन केले. “युवक हे कोणाच्याही विरोधातील शक्ती नसून 2047 च्या विकसित भारताचे शिल्पकार आहेत. त्यांच्या प्रश्नांना आणि अपेक्षांना गांभीर्याने ऐकण्याची गरज आहे,” असे त्या म्हणाल्या. आरोग्य, शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा आणि दरडोई उत्पन्न वाढ यांसाठी ठोस धोरणांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

NEET, CBSE, CUET आणि SSC GD परीक्षांशी संबंधित वादांचा संदर्भ देत अभिजीत दिपके यांनी देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, परीक्षा प्रक्रियेत वारंवार होणाऱ्या त्रुटी आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या सर्व प्रकारांसाठी जबाबदारी निश्चित होणे आवश्यक असून, धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

’10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला’

दिपके यांनी दावा केला की, NEET, CBSE, CUET आणि SSC GD परीक्षांशी संबंधित प्रश्नांमुळे लाखो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. “व्यवस्थेतील चुका विद्यार्थ्यांना भोगाव्या लागत असतील, तर उत्तरदायित्व निश्चित होणे आवश्यक आहे. अन्यथा देशातील जबाबदारीची संपूर्ण यंत्रणाच कोलमडल्याचा संदेश जाईल,” असे त्यांनी म्हटले.

जंतर-मंतरवर शांततापूर्ण आंदोलनाचा निर्धार

6 जून रोजी दिल्ली विमानतळावर समर्थकांनी एकत्र यावे आणि त्यानंतर जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी परवानगी घेण्यासाठी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याकडे जावे, असे आवाहन दिपके यांनी केले आहे. हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण, घटनात्मक आणि देशहितासाठी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. दरम्यान, अंजली दमानिया यांनीही आंदोलन शांततापूर्ण, उद्दिष्टपूर्ण आणि देशभक्तिपूर्ण राहावे, असे आवाहन करत शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक व्यवस्था उभारण्याची गरज व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Khan Sir Coaching Centre Firing: मोठी बातमी! खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार; 5 ते 6 राऊंड फायर केल्याची माहिती

अभिजीत दिपके यांचे अंजली दमानियांना आभार

या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल अभिजीत दिपके यांनी अंजली दमानिया यांचे आभार मानले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी उभे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे आगामी काही दिवसांत या आंदोलनाकडे देशभरातील विद्यार्थी, पालक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number