Bal Mane Expelled from Shiv Sena (UBT) : रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी ते अनेक वर्षे भाजपमध्ये होते. त्यांना हटवण्यामागे पक्षविरोधी कारवायांचे कारण आहे, असे संजय राऊत यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. तसेच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली असल्याचे राऊत यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अनेक वर्षे भाजपमध्ये राहिल्यानंतर बाळ माने यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केला होता. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने त्यांना रत्नागिरी मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी दिली होती. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, बाळ माने यांचा फोन नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे.
निवडणुकीतून अचानक माघार
महाराष्ट्रातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या रणधुमाळीसाठी येत्या 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक रिंगणातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवशी संपूर्ण राज्याच्या राजकारणात प्रचंड वेगाने घडामोडी सुरू असतानाच, शिवसेना ठाकरे गटाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी सर्वांनाच मोठा धक्का दिला. ते थेट भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे मागे घेतला. बाळ माने यांच्या या धक्कादायक बंडखोरीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने कठोर पावले उचलत, पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल बाळ माने यांची शिवसेनेतून तडकाफडकी हकालपट्टी केली आहे.
अर्ज मागे घेतल्यानंतर ही प्रतिक्रिया
दरम्यान, आपला उमेदवारी अर्ज नाट्यमयरित्या मागे घेतल्यानंतर बाळ माने यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या अंतर्गत राजकारणावर गंभीर आरोप करत ते म्हणाले, “या विशिष्ट मतदारसंघात एकूण 1,018 मतदार आहेत, तर त्या तुलनेत महाविकास आघाडीचे स्वतःचे संख्याबळ केवळ 200 च्या आसपास आहे. या निवडणुकीसाठी मला उमेदवारी अर्ज दाखल करताना सूचक म्हणून आघाडीतील इतर मित्रपक्षांच्या सह्यांची अत्यंत आवश्यकता होती. मी वारंवार विनंती करूनही मला या सह्या वेळेत उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत, ज्यामुळे माझ्या मनात संशयाचे वातावरण निर्माण झाले. याच दरम्यान, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार (आमदारांची खरेदी-विक्री) सुरू असल्याच्या चर्चा माझ्या कानावर आल्या. अशा प्रकारे पैशांचा गैरवापर करून किंवा घोडेबाजार करून निवडणूक लढवणे हे कोकणच्या राजकीय संस्कृतीला आणि माझ्या तत्त्वांना अजिबात मंजूर नाही, म्हणूनच मी या निवडणुकीतून माघार घेण्याचा अंतिम निर्णय घेतला.”
बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे,
पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्या बद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे! — Sanjay Raut (@rautsanjay61) June 4, 2026
सलग तीन वेळा पराभव आणि या कारणाने भाजपला गुडबाय
बाळ माने हे गेले अनेक वर्षे भाजपमध्ये काम करत होते. त्यांनी 1999 साली प्रथम विधानसभा निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. त्यानंतर 2004, 2009 आणि 2014 अशा तीन निवडणुकांमध्ये उदय सामंत आणि बाळ माने यांनी एकमेकांविरोधात निवडणुकी लढल्या. त्यात बाळ माने यांचा सलग तीन वेळा पराभव झाला. लोकसभा निवडणुकांआधी बाळ माने सक्रिय होवून त्यांनी भाजपचा प्रचार सुरू केला.
2024 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीतून उमेदवारीसाठी बाळ माने उत्सुक होते. मात्र रत्नागिरीत उदय सामंत यांची उमेदवारी निश्चित झाल्याने बाळ माने यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज भाजप रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी अखेर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत हाती मशाल घेतली. मात्र, बाळ माने यांच्या पक्ष प्रवेशाने रत्नागिरीतील इच्छुक निष्ठावंत त्या वेळेस नाराज झाले होते.
हेही वाचा – Thane MLC Election : शेवटच्या क्षणी ठाण्यात नाट्यमय घडामोड! ठाणे विधानपरिषदेत रविंद्र फाटक यांचा मार्ग मोकळा