Ashok Chavan On Congress : ‘महिला आरक्षणाचे श्रेय मोदी सरकारला नको म्हणून…’ अशोक चव्हाण यांची काँग्रेसवर बोचरी टीका; काँग्रेसचाही पलटवार

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना पक्षनेतृत्वावरही निशाणा साधला. तर, काँग्रेसनेही मागील घडामोडींची आठवण करून दिली.

Ashok Chavan On Congress : ‘महिला आरक्षणाचे श्रेय मोदी सरकारला नको म्हणून…’ अशोक चव्हाण यांची काँग्रेसवर बोचरी टीका; काँग्रेसचाही पलटवार

Ashok Chavan On Congress : महिला आरक्षण विधेयकावरून भाजप खासदार अशोक चव्हाण आणि काँग्रेस यांच्यात सध्या तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या ऐतिहासिक निर्णयाचे श्रेय मिळू नये, याच एकमेव हेतूने काँग्रेसने या प्रक्रियेत अडथळे निर्माण केल्याचा खळबळजनक आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसने विनाकारण या विधेयकात खोडा घातला असून, त्यांच्याकडे आता कोणतेही ठोस राजकीय मुद्दे उरलेले नाहीत. मतदारसंघांची पुनर्रचना करून त्यात समानता आणणे आवश्यक असतानाही केवळ राजकीय स्वार्थापोटी विरोधकांनी नकारात्मक भूमिका घेतल्याचे चव्हाण म्हणाले.

केडर संपले असून काँग्रेसला भवितव्य नाही
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना पक्षनेतृत्वावरही निशाणा साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक राज्यांमध्ये 20-20 वर्षांपासून काँग्रेसची सत्ता नाही आणि आता तिथे जमिनीवर काम करणारे केडरही शिल्लक राहिलेले नाही. महाराष्ट्रातही काँग्रेसची तीच अवस्था असून केंद्रीय नेतृत्वाला स्थानिक कार्यकर्त्यांच्या अडचणींशी काहीही देणेघेणे नाही. काँग्रेसमध्ये भवितव्य नसल्यामुळेच अनेक मोठे नेते सध्या भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक असून ते तसे खासगीत बोलूनही दाखवत आहेत.

मतदारसंघ पुनर्रचना आणि अमित शाह यांचे स्पष्टीकरण
अशोक चव्हाण यांनी मतदारसंघांच्या अवाढव्य विस्तारावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, "अमित शाह यांनी संसदेत प्रत्येक प्रश्नावर सविस्तर स्पष्टीकरण दिले होते. दक्षिण भारतातील जागा कमी होणार नाहीत, हेही सरकारने स्पष्ट केले होते. तरीही दोन-तृतीयांश बहुमतासाठी जेव्हा विरोधकांच्या मदतीची गरज होती, तेव्हा केवळ मोदी सरकारला यश मिळू नये म्हणून अडवणूक करण्यात आली." मतदारसंघांमध्ये समानता आणणे हे लोकशाहीसाठी हिताचे असताना काँग्रेसने त्यात राजकारण केल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – Chitra Wagh : पीडित महिलांनी तक्रारीसाठी पुढे यावे; नाशिक TCS प्रकरणी चित्रा वाघ यांचे आवाहन

काँग्रेसचा पलटवार: 'खोटेपणा सोडून कणा ताठ ठेवा'
अशोक चव्हाण यांच्या टीकेला काँग्रेसने सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत जहाल प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने म्हटले की, 'ज्या पक्षाशी तुमचे वडील स्व. शंकरराव चव्हाण आयुष्यभर एकनिष्ठ राहिले, त्याच पक्षाशी गद्दारी करताना तुम्हाला काहीच वाटले नाही का?' पुढे काँग्रेसने आठवण करून दिली की, महिलांसाठीचे 33 टक्के आरक्षण हे 2023 मध्येच संसदेत काँग्रेसच्या पाठिंब्याने एकमताने मंजूर झाले आहे आणि ते 16 एप्रिल 2026 पासून लागूही झाले आहे. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनीच सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण दिले होते, हे चव्हाणांनी विसरू नये, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.

राजकीय संघर्षाचे नवीन वळण
अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसकडून सातत्याने 'खाल्लेल्या मिठाला जागणे' आणि 'पाठीचा कणा ताठ ठेवणे' अशा शब्दांत टीका केली जात आहे. दुसरीकडे, चव्हाण यांनी आपण मुद्द्यांवर आधारित बोलत असल्याचे सांगत काँग्रेसच्या आरोपांना फेटाळून लावले आहे. महिला आरक्षणावरून सुरू झालेला हा वाद आता केवळ धोरणात्मक राहिला नसून, तो वैयक्तिक निष्ठा आणि राजकीय वारसा याभोवती फिरू लागला आहे. आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा – Data Centre : महाराष्ट्रात डेटा सेंटर्सचा हाय-स्पीड विस्तार; मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दिले 'हे' महत्त्वाचे आदेश

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number