BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच कुटुंबातून मोठा राजकीय धक्का बसला असून, त्यांचे सख्खे भाचे आशिष माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे मुंबईत महायुतीमधील घटक पक्षांमध्येच 'काटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे.
बड्या नेत्यांच्या नातेवाईकांना राष्ट्रवादीकडून रसद
राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मुंबईत आपली ताकद वाढवण्यासाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांना सुरुंग लावला आहे. आशिष माने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून, त्यांना प्रभाग क्र. 159 मधून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच नेहा राठोड (भाजप माजी महामंत्री) यांनीही राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले असून, त्यांना प्रभाग क्र. 156 मधून मैदानात उतरवण्यात आले आहे. मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश पार पडले असून, महायुतीमधील या 'इनकमिंग'मुळे भाजप आणि शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे.
हेही वाचा – BMC Election 2026 : मुंबई महापालिकेत शिंदेंची मोठी फिल्डिंग! 60 माजी नगरसेवकांचे तिकीट फायनल
निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू; अवघे 18 दिवस बाकी
राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम युद्धपातळीवर सुरू आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर असून 31 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. तथापी, 2 जानेवारी पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. याशिवाय, 15 जानेवारी 2026 ला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 ला निकाल लागणार आहेत.
हेही वाचा – BMC Election: BMC Election: कॉंग्रेसचंही ठरलं! वंचितसोबत युतीची अधिकृत घोषणा; जागावाटपाबाबत महत्त्वाची अपडेट
जागावाटपाचे त्रांगडे कायम
निवडणुकीला अवघे 18 दिवस उरले असतानाही महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपाची अधिकृत यादी जाहीर झालेली नाही. ठाणे जिल्ह्यात भाजप आणि शिंदे सेनेत युतीवरून अद्यापही तोडगा निघालेला नाही. तर पुण्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे, ठाकरे बंधूंच्या (उद्धव आणि राज ठाकरे) युतीमुळे मुंबईतील समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत.