Fight Over Rasgulla in Wedding: बिहारच्या बोधगया जिल्ह्यातील एका लग्नसमारंभात रसगुल्ल्यांच्या कमतरतेवरून सुरू झालेला किरकोळ वाद इतका विकोपाला गेला की तो थेट मारहाण, आरोप-प्रत्यारोप आणि लग्न मोडण्यापर्यंत पोहोचला. हॉटेलमध्ये आयोजित हा कार्यक्रम काही क्षणात रणांगण बनला आणि याचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
मिठाईच्या कमतरतेवरून वाद
दरम्यान, 29 नोव्हेंबरला एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित विवाहसोहळ्यात जेवणादरम्यान रसगुल्ल्यांची कमतरता असल्याचे सांगत वधू आणि वर पक्षात वाद सुरू झाला. साधी तक्रार अचानक वाढत गेली आणि पाहताच पाहता दोन्ही बाजूंमध्ये लाथा, मुक्का, खुर्च्या आणि हाताशी आलेल्या वस्तू वापरून मारहाण सुरू झाली. या झटापटीत अनेक जण जखमी झाले तर लग्नाचा सोहळा तणावपूर्ण बनला.
विधी पूर्ण, पण रसगुल्ल्यांच्या भांडणाने मोडले लग्न
तथापी, या भांडणापूर्वी सर्व प्रमुख विधी पूर्ण करण्यात आले होते. मात्र, समारंभाचा अंतिम टप्पा शिल्लक असतानाच गोंधळ एवढा वाढला की आयोजकांनाही कार्यक्रम थांबवावा लागला. दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव वाढला आणि शेवटी संपूर्ण लग्नच रद्द करण्यात आले. घटनेनंतर वधूच्या बाजूने बोधगया पोलीस ठाण्यात वरपक्षावर हुंडा मागितल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला. तर वराचे वडील महेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, हा मुद्दा केवळ मिठाईवरून सुरू झाला होता. हुंड्याचा आरोप खोटा आहे. प्रकरण नोंदवल्यानंतरही आम्ही लग्न करण्यास तयार होतो, पण वधूपक्षाने कोणतेही सहकार्य दाखवले नाही.
हेही वाचा – Human Washing Machine: बाजारात आले माणसांना आंघोळ घालणारे अनोखे वॉशिंग मशीन; 15 मिनिटांत पूर्ण शरीर स्वच्छ
वराच्या आईची प्रतिक्रिया
वराची आई मुन्नी देवी यांनी सांगितले की, तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असताना वधूपक्षाने लग्नासाठी आणलेले दागिने घेतले आणि कोणतीही चर्चा न करता हॉटेल सोडले. तिने दावा केला की, हॉटेलचे बहुतांश बुकिंग आणि खर्च वरपक्षाने केले होते. लग्नासाठी ते तयार होते. पण वधूपक्षाने कोणताही संवाद न ठेवता संबंध तोडले. पोलिसांनी दोन्ही कुटुंबांची विचारपूस सुरू केली असून, हुंड्याचा आरोप आणि लग्न मोडण्यामागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.