Delhi Blast Update: दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) आणखी एक महत्त्वपूर्ण धागा सापडला आहे. दहशतवादी उमरच्या मॉड्यूलमधील आणखी एक साथीदार जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याला एजन्सीने श्रीनगरमधून अटक केली आहे. त्याला दिल्लीमध्ये आणण्यात आले असून, मंगळवारी सकाळी त्याला पटियाला हाऊस येथील विशेष एनआयए न्यायालयात हजर केले जाणार आहे.
हमास-स्टाईल हल्ल्याचा कट उघड
एनआयएच्या चौकशीत दानिशकडून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपास अधिकार्यांच्या मते, तो हमासने गाझा आणि सीरियामध्ये वापरलेल्या पद्धतीची नक्कल करून, ड्रोनद्वारे हल्ला करण्याची तयारी करत होता. लहान रॉकेट, कॅमेरासह बदललेले ड्रोन आणि त्यावर बसवलेले सूक्ष्म स्फोटक अशा स्वरूपाची शस्त्रयंत्रणा तयार करण्याचे काम तो करत होता.
ड्रोन बॉम्ब बनवण्यात तज्ज्ञ
तपासातून हेही स्पष्ट झाले आहे की, दानिशला ड्रोनमध्ये स्फोटक बसवण्याचे तांत्रिक कौशल्य होते. अशा ड्रोनचा वापर गर्दीच्या ठिकाणी किंवा महत्त्वाच्या सरकारी ठिकाणांवरून उडवून लक्ष्यित स्फोट घडवून आणण्याचा त्यांचा प्लॅन होता. मात्र, मॉड्यूल पूर्णत्वास जाण्याआधीच एनआयएने त्यांना पकडले.
हेही वाचा – Delhi Blast: शू बॉम्बने झाला दिल्ली ब्लास्ट? तपासात समोर आले थरकाप उडवणारे पुरावे
स्फोटातील मृतांची संख्या वाढली
दरम्यान, 10 नोव्हेंबरला लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटात मृतांची संख्या आता 15 वर पोहोचली आहे. आणखी दोन जखमी लुकमान (50) आणि विनय पाठक (50) यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. काही गंभीर जखमी अजूनही उपचार घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदन प्रक्रिया लवकरच सुरू होईल. एनआयएला सलग मिळत असलेल्या अटक आणि पुराव्यांमुळे या दहशतवादी मॉड्यूलचे स्वरूप आणि त्यामागील मोठा कट अधिक स्पष्ट होत चालला आहे.