Anna Hazare: दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्रमक आणि संवेदनशील भूमिका घेतली आहे. शिर्डी येथील वाडिया पार्क परिसरातील गांधी स्मारकाजवळ आयोजित मूक आंदोलनात अण्णांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तरुणांच्या पाठीशी उभे राहण्याचे संकेत दिले. प्रकृती ठिक नसतानाही ते या आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र, विद्यार्थ्यांचा हा संघर्ष आणि त्यांची व्यथा पाहून अण्णांचे मन सुन्न झाले आणि ते कमालीचे भावूक झाले. त्यांचे डोळे भरून आलेले आणि रडतानाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
प्रकृती अस्वस्थ असतानाही तरुणांच्या संघर्षाशी एकजूट
देशभरात सुरू असलेल्या या विद्यार्थी चळवळीच्या पार्श्वभूमीवर ‘अण्णा हजारे कुठे आहेत?’ असा प्रश्न विचारला जात असतानाच, त्यांनी शिर्डीतील मूक आंदोलनात हजेरी लावून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. शारीरिक प्रकृती साथ देत नसल्यामुळे ते आंदोलनस्थळी फार वेळ थांबू शकले नाहीत आणि लवकरच माघारी परतावे लागले. परंतु, त्यांच्या या अल्प सहभागाने आणि तरुणांच्या दुःखात समरस होण्याच्या स्वभावाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या मागण्या अत्यंत न्याय्य आहेत आणि त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी दर्शवली.
पंतप्रधान मोदींना थेट पत्र; आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचे आवाहन
प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग नोंदवण्यासोबतच अण्णा हजारे यांनी २२ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक सविस्तर पत्र पाठवून परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, आंदोलकांवर होणाऱ्या कठोर पोलीस कारवाया आणि हिंसाचाराच्या घटना अत्यंत वेदनादायी आहेत. हा असंतोष केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नसून तो समाजाच्या व्यथा आणि अपेक्षांचे प्रतिबिंब आहे, त्यामुळे प्रशासनाने तो दडपण्याचा प्रयत्न करू नये.
Shirdi, Maharashtra: Veteran social activist Anna Hazare participated in a silent protest at the Gandhi Memorial in Wadia Park in support of the ongoing students' agitation in Delhi. Despite being unwell, Hazare joined the protest to extend his moral support to the students but… pic.twitter.com/KtCY2bsF5D — IANS (@ians_india) July 23, 2026
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याविषयी बोलताना अण्णांनी स्पष्ट केले की, अशा मंत्र्यांच्या राजीनाम्याने सरकार पडत नसते, उलट त्यातून सरकारची लोकांप्रती असलेली उत्तरदायित्त्व आणि पारदर्शकता वाढीस लागते. आंदोलकांशी कोणताही रोष न ठेवता, संवादाचे वातावरण निर्माण करावे आणि सकारात्मक माध्यमातून या संपूर्ण वादावर तोडगा काढावा, अशी आग्रही विनंती अण्णांनी देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाला केली आहे.