Anjali Damania on CJI Surya Kant : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान केलेल्या कथित वक्तव्यावरून सध्या मोठा वाद पेटला आहे. त्यांनी देशातील काही बेरोजगार तरुणांची तुलना झुरळाशी केल्याचा आरोप होत असून यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. “पारदर्शकता आणि सरकारला प्रश्न विचारणे जर चुकीचे असेल, तर होय मी झुरळच आहे आणि मला त्याचा अभिमान आहे,” अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. सरन्यायाधीशांचे हे विधान संविधानाच्या मूळ मूल्यांच्या पूर्णपणे विरोधात असल्याचे सांगत दमानिया यांनी त्यांच्याकडून माफीची मागणी केली आहे.
संविधानिक अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न
अंजली दमानिया यांनी ‘एक्स’ सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांशी बोलताना न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते लोकशाहीत व्यवस्थेला जबाबदार धरणे आणि पारदर्शकतेची मागणी करणे हा नागरिकांचा मूलभूत घटनात्मक अधिकार आहे, तो कोणताही हल्ला नाही. जेव्हा देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्थाच आपल्या नागरिकांना कीटक किंवा परजीवी म्हणते, तेव्हा प्रश्न विचारण्याची गरज अधिकच वाढते. राजकारणी आधीच स्वतःच्या मर्जीने वागत असून आता न्यायालयही अशी भाषा वापरू लागल्याने लोकशाहीच्या दिशेबाबत चिंता निर्माण होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
हा संपूर्ण वाद दिल्लीतील एका वकिलाच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सुरू झाला. संबंधित वकिलाने आपल्याला वरिष्ठ वकील दर्जा देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका वारंवार दाखल केली होती. यावर सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने तीव्र संताप व्यक्त केला. सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्याच्या सोशल मीडियावरील भाषेचा संदर्भ देत न्यायालयाने म्हटले की, काही बेरोजगार तरुण ज्यांना व्यावसायिक स्थान मिळत नाही, ते माध्यम, सोशल मीडिया किंवा माहिती अधिकार कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर विनाकारण हल्ले करत सुटतात आणि हे परजीवींसारखे आहे.
माननीय CJI साहेब, होय मी ‘झुरळ’ आहे! मी एक भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ती आहे आणि याचा मला अभिमान आहे. झुरळ कधीही मरत नाही, ते टिकून राहते, लढत राहते. पारदर्शकता आणि जबाबदारी मागणे हा ‘हल्ला’ नाही, तो आमचा संविधानिक अधिकार आहे. न्यायव्यवस्था जेव्हा नागरिकांना ‘कीटक’ म्हणते,… https://t.co/CetancI706 — Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 16, 2026
झुरळ कधीच मरत नाही, ते लढत राहते
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात नेहमीच अग्रभागी असणाऱ्या अंजली दमानिया यांनी सरन्यायाधीशांना थेट लक्ष्य केले आहे. त्यांनी उपरोधाने म्हटले की, झुरळ हा असा जीव आहे जो कधीच मरत नाही, तो कठीण परिस्थितीतही टिकून राहतो आणि लढत राहतो. जर प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना व्यवस्था कीटक समजत असेल, तर आम्ही ही लढाई अशीच सुरू ठेवू. सोशल मीडियावरही नागरिकांकडून या विधानाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात असून, कोणतीही व्यक्ती किंवा पद हे संविधानापेक्षा मोठे असू शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
न्यायालयीन सुनावणीतील कठोर ताशेरे
खंडपीठाने संबंधित वकिलाला फटकारताना वरिष्ठ वकील पद हा काही प्रतिष्ठेचा अलंकार नसल्याचे सुनावले होते. ‘ज्येष्ठत्व हे मागून मिळत नाही तर ते स्वकर्तृत्वाने मिळवावे लागते’, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. वकिलाच्या याच वर्तनाचा निषेध करताना सरन्यायाधीशांच्या तोंडून हे वादग्रस्त शब्द बाहेर पडले. या विधानामुळे सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आणि तरुणांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, लोकशाहीत नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान राखला जावा, अशी मागणी आता जोर धरताना दिसत आहे.