Anjali Damania Allegations on Parth Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे एका जमीन व्यवहारामुळे अडचणीत आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दमानिया यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आरोप केला आहे की, पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेज (Amadea Enterprises) या कंपनीने केवळ ‘कागदावर जागा घेतली नाही’, तर 1 महिन्यानंतर त्या जागेचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. इतकेच नाही, तर बाउंसरसारखे दिसणारे सिक्युरिटी गार्ड पाठवून पोलिसांच्या मदतीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला, जो अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अजित पवारांनी राजीनामा द्यावा
अंजली दमानिया यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना मागणी केली आहे की, “आता अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा आणि पुण्याच्या पालक मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे.” पार्थ पवार यांच्या कंपनीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याची बाब खूप गंभीर आहे. या आरोपांना पुष्टी देण्यासाठी दमानिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पोलिस स्टेशन डायरीची माहिती देखील जोडली आहे.
हेही वाचा – Dharashiv Tuljapur : आरोपींसाठी भाजपची दारं उघडी! ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी नगराध्यक्षपदाचा उमेदवार
पोलिस स्टेशन डायरीतील नोंदीचा तपशील
दमानिया यांनी शेअर केलेल्या कागदपत्रानुसार, 16 जून 2025 रोजी दुपारी 4 वाजून 28 मिनिटांनी मुंढवा पोलीस ठाण्यात हे कळवण्यात आले की, ॲड. तृप्ती ठाकूर यांनी फोन करून त्यांच्या ‘सिक्युरीटी’ लोकांना बॉटेनिकल गार्डनमध्ये येऊ दिले जात नसल्याने पोलिसांची मदत (कुमक) पाठवण्यास सांगितले. अधिकाऱ्यांच्या आदेशाने उपनिरीक्षक मुंडे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी गेले.
घटनास्थळी उपस्थिती: तिथे बॉटेनिकल गार्डनचे प्रमुख बाळासाहेब कदम (वय-57), महेश पुजारी आणि सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेसचे चार गार्ड हजर होते.
बाळासाहेब कदम यांनी स्पष्ट केले की, ती जागा बॉटेनिकल गार्डनच्या ताब्यात आहे.
पोलिसांचे निर्देश: पोलिसांनी सेफ सिक्युरिटी सर्विसेस कंपनीच्या लोकांना महसूल खात्याकडून अथवा दिवाणी न्यायालयातून दाद मागून आपले तक्रारीचे निवारण करावे, असे तोंडी निर्देश दिले. तसेच, सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत बोटॅनिकल गार्डनचे इन्चार्ज बाळासाहेब कदम व विरोधी पक्ष महेश पद्मश्री पुजारी यांना सूचना देण्यात आल्या. या संपूर्ण घटनेची माहिती वरिष्ठांनाही देण्यात आली आहे.
हेही वाचा – Pune Land Scam : मुंढवा जमीनप्रकरणात मोठा खुलासा; मुठे समितीच्या अहवालात पार्थ पवारांचे नाव गायब