Raj Thackeray: मुंबईतील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विशेष मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी देशाच्या भविष्यातील राजकीय समीकरणांवर एक खळबळजनक दावा केला आहे. वर्ष 2029 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अमित शाह स्वतः पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून समोर येण्याची तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. याच रणनीतीचा भाग म्हणून ठाकरे गटातून बाहेर पडलेले 6 खासदार थेट भाजपमध्ये प्रवेश न करता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले. राज ठाकरे यांच्या मते, जर ही केवळ सत्तास्थापनेची खेळी असती, तर केंद्रात सत्ता असलेल्या भाजपमध्येच या खासदारांचा प्रवेश झाला असता. मात्र पडद्यामागे काही वेगळ्याच घडामोडी सुरू आहेत.
‘ऑपरेशन टायगर’ आणि भाजपमधील अंतर्गत धुसफूस
एकनाथ शिंदे यांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ या मोहिमेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिरवा कंदील दाखवला होता, याकडे मनसे प्रमुखांनी लक्ष वेधले. या मोहिमेत संजय जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर आणि नागेश आष्टीकर पाटील या 6 खासदारांचा समावेश होता. या फुटीचा दाखला देत राज ठाकरे म्हणाले की, सध्या सत्ताधारी भाजपमध्ये अंतर्गत पातळीवर मोठी राजकीय धुसफूस सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे सध्या हा वाद समोर येत नसला, तरी आगामी काळात केंद्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे मनसे सैनिकांनी जमिनीवर पाय रोवून तयार राहिले पाहिजे.
राष्ट्रीय जनगणना आणि बोगस मतदानाबाबत मनसैनिकांना सतर्कतेचा आदेश
येत्या 30 जूनपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेच्या प्रक्रियेवर मनसे कार्यकर्त्यांनी बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश राज ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रक्रियेदरम्यान शासकीय अधिकाऱ्यांसोबत विशिष्ट राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तर फिरत नाहीत ना, तसेच गप्पांच्या ओघात मतदारांची विशिष्ट वर्गवारी केली जात आहे का, यावर डोळ्यात तेल घालून पाळत ठेवण्यास त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून येणाऱ्या स्थलांतरितांच्या दुबार मतदानाचा धोका अधोरेखित करताना ते म्हणाले की, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेले नाही. तब्बल 60 वर्षे देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसची आज काय अवस्था आहे, हे सर्वांसमोर आहे. म्हणूनच वर्ष 2029 च्या रणसंग्रामासाठी आतापासूनच मतदार याद्यांची पडताळणी मजबूत करण्याचे आदेश त्यांनी दिले.