Swaroopanand Deshmukh : मस्साजोग ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर स्वरूपानंद देशमुख यांनी आपली पहिली आणि महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. “ज्या जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला, त्यांच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहेच, पण दिवंगत संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठीही मी यापुढे कुटुंबासोबत असेल,” असे विधान त्यांनी विजयानंतर केले. या विधानाने त्यांनी केवळ राजकीय विजयच नाही, तर सामाजिक संवेदनशीलताही जपल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
‘जनता माझी ढाल बनून उभी राहिली’ – विजयाचा गुलाल कार्यकर्त्यांना समर्पित
विजयाचा गुलाल उधळल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्वरूपानंद देशमुख यांनी हा विजय तरुण मतदार आणि कार्यकर्त्यांना समर्पित केला. ते म्हणाले की, “निवडणुकीच्या काळात माझ्यावर अनेक प्रकारचे आरोप-प्रत्यारोप झाले, पण गावातील स्वाभिमानी जनता माझ्या पाठीशी ढाल बनून उभी होती. ही निवडणूक केवळ सहानुभूतीवर नाही, तर विकासाच्या विश्वासावर लढली गेली. माझ्या मतदारांनी जो आशीर्वाद दिला, तो मी निश्चितपणे सार्थ करून दाखवेन.”
एकाच फेरीत फैसला आणि विक्रमी मतदानाची साथ
केज तहसील कार्यालयात पार पडलेल्या मतमोजणीत प्रशासकीय नियोजनामुळे केवळ एकाच फेरीत निकालाचे चित्र स्पष्ट झाले. मतमोजणीसाठी 3 टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. या निवडणुकीत झालेल्या विक्रमी 84 टक्के (1,744 मते) मतदानापैकी बहुतांश मतदारांनी स्वरूपानंद यांच्या नेतृत्वाला पसंती दिली. त्यांनी संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव करत गावची धुरा आपल्या हाती घेतली आहे.
सहानुभूती फॅक्टरवर विकासाची मात?
दिवंगत संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे होते. अश्विनी देशमुख यांना मिळणारी सहानुभूती आणि स्वरूपानंद देशमुख यांची गावात असलेली पकड यामध्ये ही थेट लढत होती. अखेर मतदारांनी ‘गावची धुरा’ सांभाळण्यासाठी स्वरूपानंद यांच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे. निकालाची अधिकृत घोषणा होताच समर्थकांनी केज तहसील परिसरात गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. आता नवनिर्वाचित सरपंचांसमोर गावातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.