Anjali Damania:’सगळेच नेते भ्रष्ट, आता जनतेनेच मालक व्हावं…’; करचोरी आणि खड्ड्यांच्या मुद्द्यावरून अंजली दमानियांचा सरकारवर निशाणा

सर्वसामान्य नागरिकांनीच आपल्या हक्कांसाठी आणि देशाच्या भवितव्यासाठी रस्त्यावर उतरून मोठा लढा उभारण्याची वेळ आली आहे, असं आवाहन अंजली दमानिया यांनी केलं आहे.

Anjali Damania:’सगळेच नेते भ्रष्ट, आता जनतेनेच मालक व्हावं…’; करचोरी आणि खड्ड्यांच्या मुद्द्यावरून अंजली दमानियांचा सरकारवर निशाणा

Anjali Damania: देशातील सध्याची राजकीय आणि सामाजिक स्थिती अत्यंत गंभीर व चिंताजनक बनली आहे. आज कोणत्याही एका विशिष्ट पक्षाकडे बोट दाखवून चालणार नाही, कारण सर्वच राजकीय पक्षांचे नेते भ्रष्टतेच्या गर्तेत अडकले आहेत. अशा विपरीत परिस्थितीत आता स्वतः सर्वसामान्य नागरिकांनीच आपल्या हक्कांसाठी आणि देशाच्या भवितव्यासाठी रस्त्यावर उतरून मोठा लढा उभारण्याची वेळ आली आहे, असे सडेतोड प्रतिपादन प्रसिद्ध भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्र येथे आयोजित 'सहजीवन व्याख्यानमाले'च्या 25 व्या रौप्यमहोत्सवी वर्षात त्या 'कैफियत सामान्य माणसाची…' या विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. या प्रसंगी व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी, चिटणीस उदय कुलकर्णी यांच्यासह पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"सामान्य माणूस झुरळ आहे का?" – न्यायव्यवस्था आणि नेत्यांवर तीव्र संताप
अंजली दमानिया यांनी आपल्या भाषणात देशातील न्यायव्यवस्थेपासून ते राजकीय मानसिकतेवर तीव्र खंत व्यक्त केली. आपला देश नेमका कधी बदलणार, असा सवाल करत त्यांनी थेट देशाच्या सरन्यायाधीशांनी सामान्य माणसाची तुलना झुरळाशी केल्याचा उल्लेख करत संताप व्यक्त केला. जोपर्यंत देशाचा नागरिक चुकीच्या धोरणांविरोधात आणि अन्यायाविरुद्ध आपला आवाज बुलंद करत नाही, तोपर्यंत हे नेते कधीच सुधारणार नाहीत. लोकशाहीत लोकप्रतिनिधी हे सेवक असून जनता हीच खरी 'मालक' आहे, याची जाणीव आता नेत्यांना करून देण्याची तीव्र गरज निर्माण झाली असल्याचे दमानिया म्हणाल्या.

करदात्यांची आर्थिक लूट; राज्यात 29 हजार कोटींचे खड्डे अन् 22 हजार शाळा धोक्यात 
विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेची कशी आर्थिक पिळवणूक केली जाते, याचे धक्कादायक आकडेवारीसह त्यांनी वाभाडे काढले. देशात मोठ्या प्रमाणावर 'डेव्हलपमेंट टॅक्स फंड' गोळा केला जातो आणि एकट्या 'जीएसटी' (GST) मधून सरकारला तब्बल 41 हजार कोटी रुपये मिळतात. मात्र, या बदल्यात महाराष्ट्रातील जनतेच्या नशिबी 29 हजार कोटी रुपयांचे खड्डे आले असून नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुसरीकडे, राज्यातील तब्बल 22 हजार सरकारी शाळा आज दुरवस्थेमुळे धोक्यात आल्या आहेत. 25 हजारांपासून ते 1 लाखांपर्यंत पगार घेणाऱ्या मध्यमवर्गीयांकडून प्रामाणिकपणे कर वसूल केला जातो, मात्र त्यांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. अत्यंत क्लेशदायक बाब म्हणजे, या जुलूमाविरोधात कोणीही उघडपणे बोलायला तयार होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

गुजरातमध्ये सर्वाधिक करचोरी
दमानिया यांनी करप्रणालीच्या अंमलबजावणीवर बोलताना थेट गुजरात राज्यावर निशाणा साधला. देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कर देणे आवश्यक आहे आणि आज 'डिजिटल इंडिया'च्या मोठ्या बाता मारल्या जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. परंतु, सत्य परिस्थिती हीच आहे की देशात सर्वाधिक करचोरी गुजरातमध्ये होते. तिथले टेक्स्टाईल उद्योजक आणि बड्या कंपन्या विविध क्लृप्त्या शोधून मोठ्या प्रमाणावर टॅक्स चोरी करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

हेही वाचा – Modi Government: मोदी सरकारची 12 वर्षे पूर्ण! कलम 370 ते राम मंदिर… जाणून घ्या देशाची दिशा बदलणारे 12 मोठे निर्णय

चेहरे बदलून चालणार नाही, तर संपूर्ण 'सिस्टीम' मुळापासून बदलण्याची गरज
आपल्या भाषणाच्या शेवटी देशाच्या माजी पंतप्रधानांची आठवण काढत त्या म्हणाल्या की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे खऱ्या अर्थाने देशाचे अर्थतज्ज्ञ होते, मात्र आजच्या सत्ताधाऱ्यांना देशाची अर्थव्यवस्था आणि एकूण व्यवस्था समजतच नाही. जर देशाला भ्रष्टाचाराच्या या भीषण विळख्यातून कायमचे बाहेर काढायचे असेल, तर केवळ सत्ता बदलून किंवा राजकीय चेहरे बदलून चालणार नाही, तर संपूर्ण 'सिस्टीम' मुळापासून बदलण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी पुणेकरांना केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number