Mahapalika Election : ‘सुविधा नाही तर मतदान नाही,’ फलक लावत मतदानावर सामूहिक बहिष्कार, नागरिकांची आक्रमक भूमिका

वर्षानुवर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या या भागातील रहिवाशांनी यंदाच्या मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले आहे. परिसरात ठिकठिकाणी बहिष्काराचे बॅनर लावले आहेत.

Mahapalika Election : ‘सुविधा नाही तर मतदान नाही,’ फलक लावत मतदानावर सामूहिक बहिष्कार, नागरिकांची आक्रमक भूमिका

Akola Mahapalika Election 2026 : अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 14 मधील शिवनी परिसरातील बहुजन नगरातील नागरिकांनी एक अत्यंत टोकाचा पण महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या या भागातील रहिवाशांनी यंदाच्या मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले आहे. परिसरात ठिकठिकाणी बहिष्काराचे बॅनर लावून नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा जाहीर निषेध केला असून, “सुविधा नाही तर मतदान नाही” अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.

या भीषण परिस्थितीवर भाष्य करताना एका रहिवाशाने सांगितले की, ते या भागात सन 1972-73 पासून वास्तव्यास आहेत, परंतु इतक्या दशकांनंतरही येथे साध्या नागरी सुविधा उपलब्ध नाहीत. परिसरात केवळ एक-दोन हातपंप आहेत, मात्र त्यातून येणारे पाणी अत्यंत क्षारयुक्त आणि खारे असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्ते आणि नाल्यांची दुरवस्था झाल्यामुळे जगणे कठीण झाले असून, प्रशासनाने वारंवार विनंती करूनही याकडे लक्ष न दिल्याने अखेर सर्व बहुजन नगराने मिळून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – Pregnant Woman and Baby Death : काळजाचा थरकाप! गरोदर मातेची जंगलातून 6 किलोमीटर पायपीट; माय-लेकराच्या मृत्यूनंतरही थांबली नाही वणवण

दुसऱ्या एका संतप्त महिलेने आपली व्यथा मांडताना सांगितले की, वीज, पाणी, रस्ते आणि नाल्यांच्या समस्यांमुळे आमचे आयुष्य जनावरांसारखे झाले आहे. निवडणुकीच्या वेळी नगरसेवक मतांची झोळी घेऊन दारात येतात, पण निवडून आल्यानंतर मात्र ते फिरकतही नाहीत. “आम्ही आमच्या मागण्या घेऊन कोणाकडे जायचे? कोणीही आमचे प्रश्न सोडवण्यास तयार नाही,” अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली. निवडून आलेल्या प्रतिनिधींकडून केवळ आश्वासनेच मिळत असल्याने आता प्रत्यक्ष कृती झाल्याशिवाय आम्ही मतदानासाठी घराबाहेर पडणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

अकोल्यातील या भागातील नागरिक आता निवडणुकीतील पोकळ आश्वासनांना बळी पडण्यास तयार नाहीत. निवडणुकीपूर्वी उमेदवार मोठे दावे करतात, परंतु प्रत्यक्षात जमिनीवर कोणतीही सुधारणा दिसत नसल्याने मतदारांमध्ये प्रचंड संताप आहे. जोपर्यंत रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी आणि सांडपाण्याची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत आपला बहिष्कार कायम राहील असा ठाम निर्धार शिवनीच्या नागरिकांनी केला आहे. दरम्यान, नागरिकांकडे चौकशी केली असता, हे आंदोलन सुरू झाल्यानंतरही कोणीही लोकप्रतिनिधी किंवा उमेदवार फिरकलेला नाही, असे नागरिकांनी सांगितले. तरीही, मतदानावर बहिष्कार घालण्याचा नागरिकांचा सामूहिक निर्णय आगामी निवडणुकीत उमेदवारांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा – Nagpur Politics: नागपुरात हायव्होल्टेज ड्रामा; समर्थकांनी बंडखोर नेत्यालाच घरातच डांबलं, नेमकं झालं काय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number