Violence in Splitsvilla with Akansha Chaudhary : रिअॅलिटी शो ‘स्प्लिट्सविला’च्या सेटवर दोन स्पर्धकांमध्ये झालेल्या राड्याने हिंसेचे रूप घेतल्यामुळे प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आकांक्षा चौधरीने सह-स्पर्धक दीक्षा पवारवर मारहाणीचे गंभीर आरोप करत सोशल मीडियावर आपल्या जखमांचे फोटो शेअर केले आहेत. आकांक्षाच्या दाव्यानुसार, दीक्षाने तिला हिलच्या सँडलने निर्दयीपणे मारले. तसेच, तिच्या ओठांतून रक्त येईपर्यंत मारहाण केली. नॅशनल टीव्हीवर सर्वांसमोर घडलेली ही घटना केवळ भांडण नसून ती एक भयंकर हिंसा होती, असे आकांक्षाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नमूद केले आहे. सध्या सुरू असलेल्या या शोच्या 6 व्या सिझनमध्ये स्पर्धकांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
जखमांच्या खुणा आणि धक्कादायक खुलासा
आकांक्षाने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तिच्या डोळ्यांखाली आणि मानेवर जखमांच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत. ही घटना घडल्यानंतर 10 ते 15 दिवसांनी जेव्हा तिला तिचा फोन परत मिळाला, तेव्हा तिने हे फोटो काढले होते. तिने म्हटले आहे की, “जखमा तेव्हासुद्धा ताज्या होत्या आणि तरीही लोक माझ्याबद्दल खोटे बोलत होते. इतकं सगळं सहन केल्यानंतरही असं काही घडलंच नाही, असं मला सांगण्यात आलं.” ही पोस्ट व्हायरल झाल्यापासून सोशल मीडियावर दीक्षा पवारवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
सनी लिओनीने व्यक्त केली तीव्र नाराजी
या वादाची ठिणगी दीक्षाने आकांक्षावर कपडे फेकल्याने पडली होती. या वादामध्ये नंतर सुझाननेही उडी घेतली. कपडे फेकण्यापासून सुरू झालेले हे भांडण थेट मारहाणीपर्यंत पोहोचले. शोची होस्ट सनी लिओनी हिने देखील या प्रकारावर अत्यंत कडक शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. आकांक्षाने पुढे लिहिले की, या घटनेमुळे ती आतून पूर्णपणे कोसळली होती आणि तिला शो सोडून जायचे होते. मात्र, पळून जाणाऱ्यांपैकी ती नसल्याने तिने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला, तरीही त्या वेदना आजही तिच्या मनात कायम आहेत.
स्पर्धकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
बिग बॉसप्रमाणेच ‘स्प्लिट्सविला’ सुद्धा वादांसाठी ओळखला जातो. परंतु, यंदा या शोने सर्व मर्यादा ओलांडल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. नॅशनल टीव्हीवर अशा प्रकारे हिंसा होत असताना शोच्या निर्मात्यांनी काय पावले उचलली, असा जाब नेटकरी विचारत आहेत. दीक्षा पवारकडून अद्याप या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, ही पोस्ट आणि त्यातील जखमांचे फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून रिअॅलिटी शोमधील वाढत्या आक्रमकतेवर टीका केली जात आहे.