PMC Election 2026: पुणे महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्या कुटुंबातील व्यक्तींना तिकीट दिल्यामुळे होत असलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिले आहे. 'एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असेल, तर त्यात त्याच्या पत्नीचा किंवा सुनेचा काय दोष?' असा सवाल करत त्यांनी या उमेदवारीचे समर्थन केले आहे.
आंदेकर कुटुंबातील 'या' दोघींना उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) बंडू आंदेकर याची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. आंदेकर टोळीवर मोक्कासह अनेक गंभीर गुन्हे असतानाही त्यांना उमेदवारी दिल्याने पुण्यात राजकीय वातावरण तापले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, 'मी काही गुन्हा केला तर त्यासाठी माझी पत्नी किंवा मुलं जबाबदार आहेत का? मर्डर केला म्हणून अख्खं खानदान गुन्हेगार नसतं. काही वेळा विकृती वैयक्तिक असते. आम्ही मित्रपक्षांना जागा सोडल्या आहेत, त्यांनी कुणाला उमेदवारी द्यायची हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. इतर पक्षांच्या याद्यांमध्येही अशी नावे आहेतच, मग आम्हालाच का लक्ष्य केले जात आहे?
भाजपशी कलगीतुरा सुरूच
याचवेळी अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे महायुतीत ठिणगी पडली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांना युतीत घेताना विचार करा, असे मी फडणवीसांना आधीच सांगितले होते, असे विधान केले होते. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, रवींद्र चव्हाण हे मोठ्या पक्षाचे नेते आहेत, त्यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, पुणे महापालिकेच्या गेल्या 5 वर्षांच्या कारभारावरून त्यांनी भाजपवर सडकून टीका केली, ज्यामुळे युतीतील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता आहे.