Sunetra Pawar EC letter leak : अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सत्ता आणि पदांसाठी रस्सीखेच सुरू असल्याचे समोर आले आहे. पक्षाच्या अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची चर्चा आधीच सुरू झाली होती. मात्र, आता सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेले गोपनीय पत्र बाहेर फुटल्यामुळे पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. यासोबतच अंतर्गत वादाचे मोठे वादळ निर्माण झाले आहे. या पत्रात सुनेत्रा पवार यांचे नाव 'राष्ट्रीय अध्यक्ष' म्हणून नमूद करण्यात आले आहे, तर शिवाजीराव गर्जे यांना कोषाध्यक्ष दाखवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पक्षाचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढे त्यांच्या पदांचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. या प्रकरामुळे पक्षात दोन गट पडल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
पत्रांचा घटनाक्रम आणि सत्तेची रस्सीखेच
पक्षांतर्गत वादाची ही ठिणगी पत्रांच्या एका विशिष्ट तारखेवरून पडली आहे. अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी अपघात झाला होता, त्यानंतरच्या काळात म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड होईपर्यंत जो काही पत्रव्यवहार झाला, तो ग्राह्य धरू नये असे 10 मार्च 2026 रोजी पाठवलेल्या पत्रात सुनेत्रा पवार यांनी नमूद केले आहे. या वादाची पाळेमुळे 16 फेब्रुवारीच्या पत्रात आहेत, ज्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्षाचे सर्व अधिकार पटेलांकडे सोपवल्याचे म्हटले होते. याच पत्राला शह देण्यासाठी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला नवीन पत्र पाठवून जुन्या कार्यकारिणीला डच्चू दिल्याचे बोलले जात आहे.
नवीन कार्यकारिणी आणि काहींना सरळ बाजूला केले?
राष्ट्रवादीच्या या नवीन कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आले असून, यात प्रस्थापित नेत्यांच्या समर्थकांना बाजूला सारून तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या यादीत जय अजित पवार, सना मलिक, धीरज शर्मा आणि सरोज अहिरे यांसारख्या नावांचा समावेश आहे. छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांची नावे असली तरी, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या समर्थकांना या नवीन रचनेत स्थान मिळालेले नाही. यामुळे पक्षात संघर्ष सुरू झाला असून, वरिष्ठ नेत्यांच्या अधिकारांवर गदा आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
गोपनीय पत्राची गळती आणि कर्मचाऱ्यांची चौकशी
यातही आणखी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे सध्या पक्षासमोर सर्वात मोठे आव्हान हे आहे की, निवडणूक आयोगाला दिलेले हे अंतर्गत आणि गोपनीय पत्र आमदार रोहित पवार यांच्यापर्यंत पोहोचले कसे? या पत्राच्या गळतीमुळे पक्षात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्राचा हा 'लीक' शोधण्यासाठी पक्षाने आता अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाच्या मुख्य कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांची झाडाझडती घेण्यात आली असून, कोणाचे फोन किंवा संपर्क रोहित पवारांच्या गटाशी आहेत का, याचा कसून शोध घेतला जात आहे.
राजकीय भविष्य आणि मतभेदांची दरी
राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा अंतर्गत कलह आता मिटणार की अधिकच विकोपाला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पत्रांच्या राजकारणामुळे पक्षाची प्रतिमा जनमानसात मलीन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेत्यांमधील मतभेदांची दरी आता इतकी रुंदावली आहे की, निवडणूक आयोगाच्या तांत्रिक बाबींमध्ये पक्ष अडकण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही अंतर्गत धुसफूस अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते.