Elon Musk On AI: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज एलोन मस्क यांनी दावोस येथील जागतिक आर्थिक मंचात (World Economic Forum) मानवजातीच्या भविष्याबद्दल मोठी भाकिते केली आहेत. पुढील 5 वर्षांत म्हणजेच 2031 पर्यंत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) संपूर्ण मानवजातीपेक्षा अधिक बुद्धिमान होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
AI आणि मानवी बुद्धिमत्ता
मस्क यांच्या मते, या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षापर्यंत आपण अशा एका टप्प्यावर पोहोचू जिथे AI एका व्यक्तीपेक्षा अधिक हुशार असेल. मात्र, पुढील 5 वर्षात हे तंत्रज्ञान इतके प्रगत होईल की ते जगातील सर्व मानवांच्या एकत्रित बुद्धिमत्तेलाही मागे टाकेल. मस्क यांनी पहिल्यांदाच एआयबद्दल इतका ठोस आणि सकारात्मक दृष्टिकोन मांडला आहे.
“एलियन नाहीत, आपण एकटेच आहोत”
जगभरात परग्रहावरील सजीव (Aliens) आणि त्यांच्या उडत्या तबकड्यांबाबत (UFO) अनेक चर्चा सुरू असतात. मात्र, मस्क यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. ते म्हणाले, “माझ्या स्टारलिंक कंपनीचे अवकाशात 9,000 पेक्षा जास्त उपग्रह आहेत. आजपर्यंत एकाही एलियन स्पेसशिपमुळे आम्हाला आमचा मार्ग बदलावा लागला नाही. त्यामुळे आपण असे गृहीत धरले पाहिजे की जीवन खूप दुर्मिळ आहे आणि या विश्वात आपण कदाचित एकटेच आहोत.”
हेही वाचा – Oppo New Phone: आयफोन विसरा, ओप्पोचा ‘हा’ फोन पाहून तरुणाई झाली वेडी; फीचर्स ऐकूनच या फोनच्या प्रेमात पडाल
रोबोट्सची संख्या माणसांपेक्षा जास्त होणार
मस्क यांनी ह्युमनॉइड रोबोट्सबद्दलही महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या मते, त्यांची कंपनी ‘टेस्ला’ हजारो ‘ऑप्टिमस’ (Optimus) रोबोट्सची निर्मिती करत आहे. ‘भविष्यात रोबोट्सची संख्या अब्जावधींमध्ये असेल, जी मानवांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त असेल. हे रोबोट्स मानवांची सर्व कामे करतील, ज्यामुळे मानवी जीवन कायमचे बदलून जाईल,’ असं भाकितही यावेळी त्यांनी वर्तवलं. तथापी, मस्क यांनी जाहीर केले की, त्यांचा ‘ऑप्टिमस’ रोबोट पुढील वर्षाच्या अखेरीस विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो.
Elon Musk on AI & Robotics at Davos: "AI and robotics are the path to abundance for all. With ubiquitous AI and humanoid robots, we'll see an unprecedented expansion of the global economy. Imagine a future where robots take care of our every need, from watching over our kids… pic.twitter.com/mccD0BsAbr — Alvin Foo (@alvinfoo) January 22, 2026
अर्थव्यवस्थेला मोठी उभारी
मस्क यांच्या मते, जर ‘फ्री एआय’ आणि ‘फ्री रोबोटिक्स’ उपलब्ध झाले, तर जगाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. जरी सध्या चिनी कंपनी ‘युनिटरी’ ह्युमनॉइड रोबोट्सच्या विक्रीत आघाडीवर असली, तरी मस्क यांच्या कंपन्या या क्षेत्रात मोठी क्रांती करण्याच्या तयारीत आहेत. तंत्रज्ञानाच्या या वेगामुळे मानवी संस्कृती एका नव्या युगात प्रवेश करेल, असे संकेत मस्क यांनी दिले आहेत.