Anant Garje Wife Death: पंकजा मुंडे यांचे वैयक्तिक सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मृत युवतीचे नाव डॉ. गौरी असून, तिचा विवाह केवळ 8 ते 9 महिन्यांपूर्वी झाला होता. अल्पावधीतच तिच्या वैवाहिक जीवनात गंभीर मतभेद निर्माण झाल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
मृतक गौरीच्या वडिलांचा धक्कादायक आरोप
गौरीच्या वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत अनंत गर्जेच्या बाहेरील संबंधांबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, अनंतचा किरण नावाच्या एका महिलेबरोबर प्रेमसंबंध होता आणि संबंधित महिला गरोदरही राहिली होती. घर शिफ्ट करताना गौरीला या संबंधांचे काही कागदपत्रे, ज्यात एका गर्भवती महिलेचे संमतीपत्र आढळले होते. या दस्तऐवजांमध्ये पतीचे नाव म्हणून अनंत भगवान गर्जे नमूद होते. ही माहिती मिळाल्यानंतर अनंत आणि गौरीमध्ये तणाव वाढला.
ब्लॅकमेल आणि धमक्यांचा आरोपही समोर
गौरीच्या वडिलांनी तक्रारीत आणखी आरोप करताना सांगितले की, अनंत गर्जे गौरीला सतत धमक्या देत होता. 'हे प्रकरण घरच्यांसमोर आणलंस, तर मी सुसाईड नोटमध्ये तुझं नाव लिहून आत्महत्या करेन,' अशा पद्धतीच्या धमक्या अनंत तिला देत होता, असा आरोप गौरीच्या वडिलांनी केला आहे. याशिवाय, गौरीच्या मृत्यूप्रकरणी त्यांनी हत्या झाली असण्याची शक्यता व्यक्त केली असून, संपूर्ण बाबीची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
अंजली दमानियांनी घेतली गौरीच्या कुटुंबियांची भेट
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मृतक युवतीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरण समजून घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी काही महत्त्वाचे आरोप उघड केले. दमानिया म्हणाल्या की, 'घर बदलताना गौरीला काही कागदपत्रे सापडली. त्यात किरण इंगळे नावाच्या महिलेचे वैद्यकीय दस्तऐवज होते, ज्यात पती म्हणून अनंत गर्जेचे नाव नमूद होते. यावरूनच गौरी आणि अनंतमध्ये वाद सुरु झाले.'
हेही वाचा – 'माझी लेक…' डॉक्टर गौरी पालवेच्या मृत्यूनंतर वडिलांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले अशोक पालवे?
नणंदेकडून धक्कादायक प्रतिक्रिया
अंजली दमानिया यांनी पुढे सांगितले की, गौरीने अनंतच्या नणंदीकडे तक्रार केली असता, तिनेच उलट उत्तर दिले. ‘तुला राहायचे असेल तर राहा, नाही तर आम्ही त्याचे दुसरे लग्न करू,’ असं तिने गौरीला म्हटलं. गौरीने हे सर्व चॅटिंगचे स्क्रीनशॉट्स आपल्या वडिलांना पाठवले होते. दरम्यान, अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडे यांना गौरीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.