Ambadas Danve: राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी एका मंत्र्याने आपल्याला महिला असल्याने नाकारल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “प्रशासकीय अधिकारी हे सरकारच्या दबावाखाली काम करतात आणि त्यामुळेच ते अनेक गोष्टी बोलू शकत नाहीत,” असे विधान दानवे यांनी केले. मनीषा म्हैसकर या अत्यंत सक्षम अधिकारी आहेत, मात्र त्यांनी हा प्रकार जेव्हा घडला होता, तेव्हाच यावर भाष्य करायला हवे होते, असेही दानवे यांनी नमूद केले.
‘महिला सचिव नको’ म्हणणारा तो मंत्री कोण? प्रशासनातील भेदाभावावर चर्चा
नवी दिल्ली येथे होणाऱ्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत म्हैसकर यांनी हा कटू अनुभव सांगितला. 2023 मध्ये सरकार स्थापन झाले तेव्हा एका मंत्र्याने “मला माझ्या खात्यासाठी महिला सचिव चालणार नाही,” अशी उघड भूमिका घेतली होती. मनीषा म्हैसकर यांच्या 33 वर्षांच्या दीर्घ कार्यकाळात त्यांना आलेला हा पहिलाच आणि धक्कादायक अनुभव होता. या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिला अधिकाऱ्यांना दिली जाणारी ही वागणूक चर्चेचा विषय ठरली असून, संबंधित मंत्री नेमका कोण? यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अंबादास दानवे यांचा सरकारला टोला आणि सद्यस्थितीवर भाष्य
अंबादास दानवे यांनी सद्यस्थितीवर भाष्य करताना म्हटले की, प्रशासनातील अधिकाऱ्यांची मुस्कटदाबी आताही सुरूच आहे. दबावामुळे अनेक वरिष्ठ अधिकारी उघडपणे बोलण्याचे धाडस करत नाहीत. मनीषा म्हैसकर यांनी त्यांच्या वाट्याला आलेला अन्यायाचा प्रसंग मांडला असला, तरी सध्याच्या प्रशासकीय कार्यपद्धतीतही अधिकारी दबावाखालीच असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणावरून आता प्रशासनातील महिला-पुरुष भेदाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, विरोधकांनी यावरून सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. अद्याप या प्रकरणावर सरकारकडून किंवा कोणत्याही मंत्र्याकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.