Abu Azmi On Delhi Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी या घटनेवर तीव्र भूमिका घेतली आहे. त्यांनी सरकारला आवाहन केले की, "या हल्ल्याचा तपास जलदगतीने करून सहा महिन्यांच्या आत खऱ्या दोषींना फाशी द्यावी. मात्र, निष्पापांना अन्यायकारक शिक्षा करू नये.” आझमी म्हणाले की, दिल्ली हे फक्त शहर नसून देशाची राजधानी आहे, त्यामुळे येथे सुरक्षेत झालेला त्रुटी हा गंभीर गुप्तचर अपयश आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त करत म्हटलं की, “देशात प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावा, हे सरकारचं कर्तव्य आहे.”
अबू आझमी यांनी मुंबईतील ट्रेन बॉम्बस्फोटाचा संदर्भ देत सांगितलं की, “त्या घटनेत 187 लोकांचा मृत्यू झाला, पण आजपर्यंत खरे गुन्हेगार शिक्षा टाळून गेले, तर अनेक निष्पाप लोक 19 वर्षे तुरुंगात राहिले. शेवटी न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवलं.”
मलाही निर्दोष असून तुरुंगवास भोगावा लागला
ते पुढे म्हणाले, “मलाही मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात कोणत्याही पुराव्याशिवाय अटक झाली. मी एक वर्ष तुरुंगात राहिलो. माझं कुटुंब, माझे वकील प्रयत्न करत राहिले आणि शेवटी माझं निर्दोषत्व सिद्ध झालं. पण ज्यांच्याकडे पैसा किंवा साधनं नाहीत, त्यांचं काय?” अबू आझमींनी फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूल प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “आज सुशिक्षित युवकही दहशतवादात ओढले जात आहेत, हे खूप दुर्दैवी आहे. दहशतवाद हा अन्याय आणि अत्याचारातून जन्म घेतो. म्हणून अत्याचार संपला, तर दहशतवादही संपेल.”
निवडणुकीदरम्यान स्फोट का होतात?
दरम्यान, अबू आझमी यांनी म्हटलं की, प्रत्येकवेळी निवडणुका आल्या की अशा घटना घडतात, याची चौकशी झाली पाहिजे. हे फक्त राजकारण नाही, तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.