Aaditya Thackeray: कोस्टल रोडच्या श्रेयवादावरून शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, ‘नोटबंदी किंवा इतर जी काही कामे तुम्ही केली असतील, त्याचे क्रेडिट तुमचेच आहे. परंतु, कोस्टल रोडचे काम आम्हीच केले आहे. कोस्टल रोडच्या कामाबाबत आम्ही पुरावे म्हणून फोटो दाखवण्यास तयार आहोत, तसे तुम्हीही फोटो दाखवा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी भाजपला केले आहे. या प्रकल्पावरून त्यांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सध्या राज्यात महापालिका निवडणुकांवर विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. अशातचं आता आदित्य ठाकरे यांनीही कोस्टल रोडचं क्रेडिट आपल्या पक्षाचं असल्याचा दावा करत भाजपवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, दिल्ली दंगल कटाच्या प्रकरणात उमर खालिद आणि शरजील इमाम यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. आदित्य ठाकरे यांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत देशातील न्यायव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. देशात न्यायाचे ‘दुहेरी निकष’ लावले जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
आदित्य ठाकरेंचा न्यायव्यवस्थेवर प्रहार
प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, जर कुलदीप सेंगरला जामीन मिळू शकतो आणि बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना जामीन मंजूर होऊ शकतो, तर उमर खालिदला तो का नाकारला जातो? आपल्या देशात यापेक्षा मोठा न्यायालयीन गुन्हा असू शकतो असे मला वाटत नाही. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, एका बाजूला गंभीर गुन्ह्यातील आरोपींना सवलत मिळते, तर दुसऱ्या बाजूला काही प्रकरणांत जामीन नाकारला जातो, हे अनाकलनीय आहे.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या विधानात भाजपचे माजी नेते आणि उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी कुलदीप सिंग सेंगर यांच्या जामिनाचा विशेष उल्लेख केला. 23 डिसेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने सेंगरला जामीन मंजूर केला होता, ज्यावर पीडितेच्या कुटुंबीयांनी मोठा निषेध व्यक्त केला होता. याच पार्श्वभूमीवर, उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या जामीन अर्जांवर होणाऱ्या कारवाईबाबत आदित्य ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.