Kishori Pednekar: ‘महाराष्ट्रात चिमुरडीवर अत्याचार अन् तुम्ही पेढे वाटताय?’; किशोरी पेडणेकरांची भाजपवर जळजळीत टीका

सभागृहात अभिनंदनाचा ठराव मांडून पेढे वाटणाऱ्या भाजपला शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आरसा दाखवला.

Kishori Pednekar: ‘महाराष्ट्रात चिमुरडीवर अत्याचार अन् तुम्ही पेढे वाटताय?’; किशोरी पेडणेकरांची भाजपवर जळजळीत टीका

Kishori Pednekar: पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भाजपने मुंबई महापालिका मुख्यालयात मोठा जल्लोष केला. सभागृहात अभिनंदनाचा ठराव मांडून पेढे वाटणाऱ्या भाजपला शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आरसा दाखवला. “महाराष्ट्रातील लेकींवरील अत्याचाराचा विसर पडून तुम्ही विजयाचा जल्लोष कसा करू शकता?” असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

नसरापूर प्रकरणाची आठवण आणि भाजपवर टीका
सभागृहाचे कामकाज सुरू होताच भाजप नेते गणेश खणकर यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यावर बोलताना किशोरी पेडणेकर यांनी भाजपला पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील दुर्दैवी घटनेची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या, “इथे महाराष्ट्रात नसरापूरमध्ये एका चिमुरड्या बालिकेवर अत्याचार करून तिला संपवण्यात आलं. त्याबद्दल भाजपचा एकही नेता बोलत नाही. तेव्हा गळे काढणाऱ्या भाजपच्या महिला नेत्यांना आता या मुलीचा विसर पडला आहे का?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

“हिंदुत्व लोणच्यासारखं वापरू नका”
भाजपच्या राजकारणावर खोचक टिप्पणी करताना पेडणेकर यांनी सत्ताधाऱ्यांना सल्ला दिला की, “सगळीकडे हिंदुत्वाचा वापर लोणच्यासारखा (स्वाद वाढवण्यासाठी) करू नका. तुम्ही बंगालच्या विजयाचे पेढे वाटताय, पण महाराष्ट्रात 6 महिन्यांच्या बाळापासून ते 70 वर्षांच्या आजीपर्यंत महिलांवर अत्याचार होत आहेत, त्याचे काय?” पुण्यात भरदिवसा तलवारी काढल्या जात आहेत, तिथे कायदा-सुव्यवस्था राखण्यात तुम्ही मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरत आहात, अशी टीका त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.  

लोकशाही आणि अखंड भारताचा मुद्दा
भारताच्या अखंडतेबद्दल बोलताना पेडणेकर यांनी नमूद केले की, “देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होणार नसेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र उभे राहिले पाहिजे. पण भारताने लोकशाही स्वीकारली आहे, हुकूमशाही नाही. कोणत्या तरी एका जातीला टार्गेट करून देश अखंड राहू शकत नाही. लोकशाहीच्या चौकटीत राहूनच देशाला एकत्र ठेवले पाहिजे.”

हेही वाचा – Vijay Thalapathy : तामिळनाडूत ‘विजय’ नावाचं वादळ! रजनीकांत-कमल हासन यांना जे जमलं नाही, ते थलपतीने करून दाखवलं; ‘ही’ खेळी ठरली यशस्वी

सभागृहात पेढ्यांचे राजकारण
मुंबई महापालिकेत सोमवारी विचित्र परिस्थिती पाहायला मिळाली. भाजपने तीन राज्यातील विजयासाठी पेढे वाटले, तर दुसरीकडे काँग्रेसनेही केरळमधील विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सभागृहात पेढे वाटले. या जल्लोषाच्या वातावरणात किशोरी पेडणेकर यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि ‘नसरापूर’च्या घटनेवरून विचारलेले प्रश्न महापालिकेत चर्चेचा विषय ठरले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number