Traffic E-Challan Scam : तुम्ही ट्रॅफिक सिग्नल तोडलाय म्हणून दंडाचा मेसेज आलाय का? तर घाईघाईत पेमेंट करण्यापूर्वी दहावेळा तपासा. कारण मुंबईत सध्या ई-चालानच्या नावाखाली सर्वसामान्यांचे खिसे रिकामे करणारा एक मोठा स्कॅम सुरू आहे. सायबर भामट्यांनी चक्क सरकारी वेबसाईटची हुबेहूब नक्कल करून लोकांची फसवणूक सुरू केली असून, प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन श्रीधर व्ही (Shridhar V) याने या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड केला आहे.
असा लावला जातोय चुना
फसवणूक करणाऱ्यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (MoRTH) अधिकृत पोर्टलसारखेच दिसणारे एक बनावट पोर्टल तयार केले आहे. हा स्कॅम कसा चालतो, हे श्रीधरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सविस्तर सांगितले आहे. “तुमचे चालान अद्याप भरलेले नाही, त्वरित पैसे न भरल्यास दंड वाढेल,” असा मेसेज लिंकसह पाठवला जातो.
बनावट लिंक
खऱ्या वेबसाईटची लिंक ‘echallan.parivahan.gov.in’ अशी आहे. मात्र, स्कॅमर्सनी ‘echallan.pasvahan.icu’ अशी लिंक तयार केली आहे. यात ‘Parivahan’ ऐवजी ‘Pasvahan’ असा शब्द वापरून हुबेहूब सरकारी वेबसाईटसारखा ले-आउट तयार केला आहे. या लिंकवर क्लिक करून दंड भरल्यास तो सरकारला न मिळता थेट सायबर गुन्हेगारांच्या खात्यात जमा होतो.
हेही वाचा – Bhiwandi BJP Rada : भिवंडीत माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक; तणावपूर्ण परिस्थिती
एका सतर्कतेने वाचले पैसे
श्रीधरने सांगितले की, मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याला संशय आला. त्याने लिंकमधील ‘URL’ बारकाईने तपासली असता ‘Pasvahan’ ही चूक त्याच्या लक्षात आली. त्याने वेळीच व्यवहार थांबवला आणि या फसवणुकीची माहिती सर्वांना दिली. त्याची ही पोस्ट आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिली असून, मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हेही वाचा – Mumbai Crime : अंधेरीत सोसायटीवर अंदाधुंद गोळीबार; आरोपी फरार, पोलिसांत गुन्हा दाखल
Who says Indians are not innovative? Look at the sophistication of this scam ? I almost entered my card details before googling the domain. Insane amount of fraud must be happening with so many people. By the time police starts acting on it, they’d make millions! Terrible ? pic.twitter.com/KZyg6R4RnI — Shridhar V (@iimcomic) January 17, 2026
फसवणूक कशी टाळाल? प्रशासनाचा सल्ला
कोणत्याही अनपेक्षित मेसेजमधील लिंकवर क्लिक करण्यापूर्वी स्पेलिंग तपासा.
सरकारी वेबसाईट्सच्या शेवटी नेहमी ‘.gov.in’ असते, हे लक्षात ठेवा.
चालान भरण्यासाठी शक्यतो अधिकृत ‘MTP’ (Mumbai Traffic Police) ॲप किंवा थेट महाट्रॅफिक चालानच्या वेबसाईटचाच वापर करा.